
मुंबई : नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा ट्विटरवर सद्गुरू रेस्ट्रो बारचा फोटो शेअर केला आहे. समीर दाऊद वानखेडे यांचे हे फर्जीवाडा केंद्र आहे, असे कॅप्शन या फोटोला दिले आहे. यासंदर्भात समीर वानखेडे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना, भारतीय महसूल सेवेमध्ये (आयआरएस) रुजू झाल्यापासून हा परवाना आपल्या नावे आहे. या परवान्यासंदर्भातील कायदेशीर हक्क हे समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्याकडे देण्यात आले आहेत. यात बेकायदेशीर असे काहीच नाही. सेवेमध्ये रुजू झाल्यापासून म्हणजेच २००६ पासून या बार आणि रेस्टॉरंटचा उल्लेख माझ्या वार्षिक स्थावर मालमत्तेमध्ये करत आहे. तसेच या परवान्याबद्दलचाही उल्लेख संपत्तीच्या हिशोबात दिला आहे. या उद्योगामधून मिळणाऱ्या कामाईचा सर्व उल्लेख प्राप्तीकर परताव्याच्या कागदपत्रांमध्ये केला आहे, असे म्हटले आहे.
Sameer Dawood Wankhede का एक और है यह फर्जीवाड़ा केंद्र pic.twitter.com/IUR2LtMeWZ
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 19, 2021
मुंबई क्रूझ ड्रग्ज केस प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला झालेल्या अटकेनंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप करताना पाहायला मिळत आहेत. साधारण दररोज एखादा नवीन आरोप किंवा दावा नवाब मलिक यांच्याकडून होताना पाहायला मिळत आहे. यातच आता एका रेस्ट्रो बारचा फोटो शेअर करत नवाब मलिकांनी समीर वानखेडे यांच्यासंदर्भात मोठा दावा केला आहे. नवी मुंबईतील वाशी येथे एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नावावर एक रेस्ट्रो बार आहे. या रेस्ट्रो बारचे नाव सद्गुरू असून, उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, या बारसाठीचा परवाना २७ ऑक्टोबर १९९७ मध्ये देण्यात आला असून, ३१ मार्च २०२२ पर्यंत वैध आहे. यावरूनच नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, समीर वानखेडे यांच्यावर खंडणीचे आरोपही केले जात आहेत. अशातच समीर वानखेडेंविरोधात आणखी एक प्रकरण पुढे आले आहे. ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या एका २० वर्षीय तरुणाने वानखेडे यांच्यावर धक्कादायक आरोप केला आहे. व्यक्तिगत वादातून वानखेडे यांनीच माझ्या घरात ड्रग्ज ठेवल्याचा आरोप या तरुणाने केला आहे. व्यक्तिगत शत्रुत्व काढण्यासाठी समीर वानखेडे यांनी हे सगळे केल्याचा मोठा दावा झैद राणा याने केला आहे.
भांडाफोड होऊ नये म्हणून बार ॲण्ड रेस्टॉरंट भाड्याने दाखवला…
समीर दाऊद वानखेडे याची नोकरी जाणार आणि तो जेलची हवा खाणार हे अगोदरपण जाहीर केले होते आणि त्या विधानावर आजही ठाम असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषदेत केला.
दरम्यान आज समीर दाऊद वानखेडे हा दारुचा व्यवसाय (बार ॲड रेस्टॉरंट) करत असल्याचा गंभीर आरोप करतानाच ही सरकारी नियमांची पायमल्ली असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला. इतके सर्व फर्जीवाडे समोर पुराव्यानुसार मांडले आहेत त्यामुळे आता तरी केंद्र सरकारने त्याला वाचवण्याचा प्रयत्न करू नये. फर्जीवाडयाच्या समर्थनार्थ सरकारे उभी राहिली तर त्यांची प्रतिमा मलीन होऊ शकते. पूर्ण विभाग बदनाम होतोय आणि असं असतानाही त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न होत असेल तर भाजप व केंद्रसरकार त्याच्या पाठीशी आहे हे स्पष्ट होईल असेही नवाब मलिक म्हणाले.
समीर वानखेडेचे वडील राज्य उत्पादन शुल्क विभागात काम करत असताना फर्जीवाडा करुन एक लायसन्स समीर दाऊद उर्फ ज्ञानदेव वानखेडे याच्या नावावर सन १९९७ – ९८ मध्ये घेतले. हे परमिट सन १९९७ पासून समीर वानखेडे याच्या नावावर नुतनीकरण होत राहिले आहे. ते आता २०२२ पर्यंत ३ लाख १७ हजार ६५० रुपये भरून करण्यात आलेले आहे. समीर वानखेडे याचे वय त्यावेळी १७ वर्षे १० महिने १९ दिवस होते. तरीही त्याच्या वडिलाने लायसन्स मिळवले. मुळात १८ वर्षाखालील कुणालाही लायसन्स दिले जात नाही असे असताना ९७ पासून आजपर्यंत सद्गुरु रेस्टॉरंट आणि बार हा व्यवसाय सुरू आहे. २०१७ मध्ये समीर दाऊद वानखेडे याने आपली संपत्ती जाहीर केली आहे त्यात त्याने याचा उल्लेख करताना त्याची १९९५ मध्ये एक कोटी किंमत दाखवली आहे शिवाय वडील आणि आई यांची नावे आहेत ही आईकडून संपत्ती मिळाली आणि वर्षाला २ लाख रुपये भाडे मिळते असे नमूद केले आहे. २०२० मध्येही तीच किंमत आणि तितकेच भाडे मिळत असल्याचे नमूद केले आहे हाच फर्जीवाडा आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
केंद्र सरकारच्या सनदी अधिकाऱ्यांना दरवर्षी आपली संपत्ती जाहीर करावी लागते मात्र नोकरीस लागताना म्हणजे २०१७ पर्यंत ही माहिती लपवली आहे. त्यानंतर माहिती दिली परंतु भाडे मिळत आहे अशी माहिती दिली आहे. चक्क दारुचा व्यवसाय समीर दाऊद वानखेडे करत आहे. जो सरकारी नियम (कलम १९६४) नुसार कुठलाही केंद्रसरकारचा अधिकारी नोकरी करताना व्यवसाय करु शकत नाही परंतु ज्याप्रकारे या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत हा फर्जीवाडा आहे. समीर वानखेडे याने दारु व्यवसाय सुरू ठेवून भाड्याने दिला आहे असे सांगणे ही माहिती जाणूनबुजून लपवली आहे आणि सरळसरळ केंद्रसरकारचे सरकारी नियम धाब्यावर बसवून पायमल्ली केली आहे. त्यामुळे त्याला नोकरीत राहण्याचा अधिकार नाही. येत्या तीन – चार दिवसात याबाबत डीईपीटो यांच्याकडे व इतर यंत्रणांकडे तक्रार करणार असल्याचे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
समीर दाऊद वानखेडे याच्यावर आर्यन खान प्रकरणात खंडणी मागितल्याचा त्यानंतर दलितांचे अधिकार हिरावून घेतल्याचा आणि आता दारुचा व्यवसाय करत असल्याची माहिती लपवल्याचा असे तीन प्रकारचे आरोप आणि पुरावे असल्याने या तिन्ही प्रकारात नोकरी जाणार आहे हे निश्चित आहे असेही नवाब मलिक म्हणाले.
कायद्यात आपली जागा भाड्याने देऊ शकतो. मात्र लायसन्स हे ऑपरेटरच्या नावानेच निघतात. धंदा करण्यासाठी जागा देऊ शकता. लायसन्स तुमच्या नावावर आहे. व्यवसाय तुम्ही करताय आणि भाड्यावर दिले आहे हे सांगणे चुकीचे आहे. बिझनेस, सर्व्हीस नियमाचा दुरुपयोग झाला आहे त्याची तक्रार करणार असल्याचे सांगतानाच सर्व तथ्य समोर ठेवतोय. चौकशी होईल. केंद्रसरकार त्याला वाचवणार नाही. जो पण कोण व्यक्ती असेल तो कायद्यापेक्षा मोठा नाही. सर्वांनी कायद्याच्या चौकटीत राहिले पाहिजे परंतु समीर वानखेडे याने कायद्याची पायमल्ली केली आहे त्यावर कारवाई होईलच परंतु एका वर्षात फक्त दोन लाख ४० हजार रुपये भाडे येत असेल तर काळा धंदा गोर्या लोकांचा खेळ सुरु आहे. दोन नंबरचे पैसे घेतले जात आहेत भांडाफोड होऊ नये म्हणून भाड्याने दाखवले जात आहे याची चौकशी झाली तर सत्य समोर येईल असेही नवाब मलिक म्हणाले.
समीर दाऊद वानखेडे याने नाव बदलण्याचा प्रयत्न २७ एप्रिल १९९३ रोजी प्रतिज्ञापत्र मुंबई मनपासमोर ठेवून केले. हे प्रतिज्ञापत्र दोन व्यक्तींनी केले आहे एक जीवन जोगल (रा. मुलुंड) आणि दुसरा अरुण चौधरी (रा. कल्याण) यांचा समावेश आहे. या दोघांनी मनपामध्ये दाऊद वानखेडे नाही तर ज्ञानदेव वानखेडे आहे असे प्रतिज्ञापत्र सादर केले.जे होऊ शकत नव्हते परंतु त्यावेळच्या अधिकार्यांना मॅनेज करण्यात आले आहे आणि जन्मदाखल्यात एक कॉलम बनवून बाजूला ज्ञानदेव लिहिण्यात आले त्यानंतर नवीन जन्मदाखला तयार झाला. नवीन जन्मदाखल्यावरून सेंट पॉल हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. सुरुवातीचे नाव बदलून समीर ज्ञानदेव वानखेडे करण्यात आले आहे. फर्जीवाडा करुन मुंबई मनपाचे रेकॉर्ड बदलण्यात आले. १९९५ मध्ये मुंबई कलेक्टरकडे अर्ज दाखल करण्यात आला. त्यावेळी वडिलांचा जातीचा दाखला दाखवण्यात आला त्यानंतर फर्जीवाडा करत अनुसूचित जातीचा दाखला मिळवला त्याचा लाभ त्याने व बहिणीने घेतला. त्याच आधारावर आयआरएसची (IRS) नोकरी मिळवली. जातपडताळणी समितीसमोर हे प्रकरण गेले आहे. ज्यावेळी याची छाननी होईल त्यावेळी हा सगळा बोगस दस्तऐवजांचा खेळ समोर येईल व नोकरी जाईल असेही शेवटी नवाब मलिक म्हणाले.




