Top Newsराजकारण

राज्यात आघाडी, मात्र ठाण्यात शिवसेना-राष्ट्रवादीत बिघाडी !

ठाणे : राज्यात आघाडीमध्ये सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत ठाण्यात रोज कुलगीतुरा सुरु आहे. आधी निधीवरुन शिवसेनेला महापालिकेत घेरणाऱ्या राष्ट्रवादीने ठाण्यात आघाडी नसल्याचे जाहीर केले. आता मिशन कळव्याची भाषा करणाऱ्यांनी आम्ही जर कमिशन टीएमसी उघडकीस आणले तर ठाणेकरांना तोंड दाखवायला तुम्हाला जागा उरणार नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी लगावला आहे. त्यामुळे नव्या वर्षात पालिका पातळीवर हा संघर्ष आणखीनच चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

महापौर नरेश म्हस्के यांनी मिशन कळवा सुरू करून कळव्यात शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणू, असा दावा केला होता. या विधानाचा परांजपे यांनी चांगलाच समाचार घेतला. परांजपे म्हणाले की, काल शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि महापौर म्हस्के यांनी नविन वर्षामध्ये मिशन कळवा राबवून सबंध कळव्यात शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणू, अशी घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे येत्या आठवड्यात शिवसेना मिशन मुंब्रा सुरु करणार आहे. त्यांच्या या घोषणेचे स्वागत करतानाच नवीन वर्षामध्ये ‘कमिशन टीएमसी’ म्हणजेच शौचालयापासून कचऱ्यापर्यंत आणि रस्त्यापासून परिवहन सेवेपर्यंत तसेच पाण्यापासून स्मार्ट सिटीपर्यंत जे काही कमिशन खाल्ले गेले. त्याबाबत जनजागृती मोहीम राष्ट्रवादी सुरु करणार आहे. त्यांच्या कमिशन कळव्याचे स्वागत करताना कमिशन टीएमसी ही मोहीम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रत्येक वॉर्डात सुरु करतील. म्हणजेच, ठाण्यात न उचलला जाणारा कचरा, घनकचरा व्यवस्थापनाचा बोजवारा, टीएमटीचे वाजलेले बारा, स्मार्ट सिटीमध्ये रखडलेले प्रकल्प या सर्वांबाबतची जनजागृती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करणार आहे.

दरम्यान, आम्हाला पक्षश्रेष्ठी जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार आणि गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी आदेश दिले तर आम्ही आघाडी करायला तयार आहोत. पण, जर ते मिशन कळवा राबविणार असतील तर आम्ही कमिशन टीएमसी राबवून करु. आम्ही पूर्ण ताकदीने निवडणूक लढवू, असेही परांजपे यांनी सांगितले.

खारीगाव येथील रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलाचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते जरुर व्हावे; पण, त्या आधी खासदार श्रीकांत शिंदे यांनी हे पिंक बुक जरुर वाचावे, अभ्यास करावा; म्हणजे, हे प्रकल्प कधी मंजूर झाले व ते मंजूर होण्यासाठी कोणी पाठपुरावा केला हे त्यांना कळेल, असा टोलाही त्यांनी शिंदे यांना लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button