फोकसराजकारण

क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलावे; इतिहास काढला तर महागात पडेल : आव्हाड

मुंबई : क्रुझवरील ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक केल्यापासून एनसीबीच्या कारवाईवर राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. क्रुझवर उपस्थित असणाऱ्या बड्या ड्रग्ज माफियाला समीर वानखेडे यांनी सोडून दिलं असा दावा मलिकांनी केला आहे. मलिक हे सातत्याने समीर वानखेडे यांच्यावर टीकास्त्र सोडत आहेत. त्यामुळे, वानखेडे कुटुंबीयही मैदानात उतरले असून पत्नी क्रांती रेडकर यांनी नवाब मलिक यांना इशारा दिला आहे.

मलिकांनी केलेल्या आरोपावर समीर वानखेडे यांचं कुटुंब चांगलेच भडकले आहे. समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी जात प्रमाणपत्रावरुनही स्पष्टीकरण दिलंय. जात प्रमाणपत्रानुसार समीर वानखेडे हिंदू आहेत ते नाकारलं जाऊ शकत नाही. नवाब मलिक यांनी कोर्टात जावं. मंत्री नवाब मलिक खूप खालच्या पातळीवर गेलेत आहेत. त्यांना राजीनामा द्यावाच लागेल. आरोप करताना लाज वाटली पाहिजे. हिंदू महार असल्याचं प्रमाणपत्र सासऱ्यांनी सगळ्यांना दाखवलं आहे. नवाब मलिकांनी जे आरोप केलेत ते कोर्टात सिद्ध करावे. जितक्या खालच्या दर्जाला जात आहे, त्याने असंच वाटतं मंत्रिपदाचं त्यांना काही देणंघेणं नाही, असेही क्रांती रेडकर यांनी म्हटलं आहे.

क्रांती रेडकर यांच्या या वक्तव्यावरुन मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. क्रांती रेडकर यांनी सांभाळून बोलावं. कारण जर इतिहास काढला तर महागात पडेल आणि लक्षात येईल की हमाम में सब नंगे है, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी लगावला आहे. तसेच पत्नी म्हणून ती तिचे कर्तव्य पार पाडत असल्याचेही जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे ज्या क्रुझवर अमली पदार्थाची पार्टी झाली त्यात ४ हजार जणांचा समावेश होता. मात्र त्याली फक्त सहा जणांनाच अटक कशी होते, उर्वरीत ३९९४ जण कुठे आहेत, त्यांना का सोडण्यात आले असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

दरम्यान, नवाब मलिक हे घाणेरडं राजकारण करत आहेत, ते आमच्या वैयक्तिक बाबी, फोटो, कागदपत्रे सोशल मीडियावरुन जाहीर करत आहेत. आता, आमच्या संयमाचा बांध फुटत आहे, त्यामुळे आता आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू, असा इशाराच क्रांती रेडकर यांनी दिलाय. तसेच, नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या बर्थ सर्टीफिकेटवरुन चॅलेंज दिले होते. जर, मी शेअर केलेला जन्मदाखला खोटा असेल, तर मी राजकारण सोडून देईन असे मलिक यांनी म्हटले होते. त्यावरही, क्रांती रेडकर यांनी उत्तर दिलंय, आता त्यांना ते सोडावं लागेल, असं क्रांती रेडकर यांनी म्हटलं आहे.

मुनगंटीवारांना टोला

भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी असे अनेक दाखले बनावट निघतात, वानखडे यांचेही त्यातील एक असावे असे सांगितले आहे. यावर आव्हाड यांनी मुनगुटीवार हे जर त्यांच्या खोटय़ा दाखल्याचे समर्थन करीत असतील तर त्यांच्या धेर्याचे कौतुक असल्याचेही त्यांनी सांगितले.

आईच्या आनंदासाठी मुस्लिम पद्धतीने लग्न केले : समीर वानखेडे

नवाब मलिकांच्या आरोपांवर समीर वानखेडे यांनी उत्तर दिले की, मी जन्माने हिंदू आहे आणि दलित कुटुंबातून आलो आहे. मी आजही हिंदू आहे. धर्म कधीच बदलला नाही. भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. माझे वडील हिंदू आणि आई मुस्लिम होती. मला दोन्ही आवडतात. माझी आई मुस्लिम होती आणि मी मुस्लिम पद्धतीने लग्न करावे अशी तिची इच्छा होती, म्हणून मी माझ्या आईच्या आनंदासाठी मुस्लिम पद्धतीने लग्न केलं, अशी माहिती त्यांनी दिली

वानखेडे पुढे म्हणाले की, लग्न झाले त्याच महिन्यात मी विशेष विवाह कायद्यांतर्गत लग्नाची नोंदणी केली होती. दोन वेगळ्या धर्माचे लोक एकत्र येतात, तेव्हा एक विशेष करार असतो, यात धर्म बदलत नाही. काही काळानंतर आमचा कायदेशीर घटस्फोटही झाला आहे. मी जर धर्म बदलला असेल तर नवाब मलिकांनी त्याचे प्रमाणपत्र दाखवावे, असे आव्हानही वानखेडे यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button