राजकारण

किरीट सोमय्यांचा आता अर्जुन खोतकरांवर १०० कोटीच्या घोटाळ्याचा आरोप

औरंगाबाद : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांवरील आरोपांची मालिका सुरुच ठेवली आहे. सोमय्या यांचं पुढचे टार्गेट शिवसेना नेते अर्जुन खोतकर असल्याचं आता स्पष्ट झालंय. सोमय्या हे आज औरंगाबाद दौऱ्यावर होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्याचवेळी अर्जुन खोतकर यांनी १०० कोटीचा घोटाळा केला आहे आणि त्याची तक्रार सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी आणि आयकर विभागाकडे केल्याची माहिती सोमय्या यांनी दिलीय.

शरद पवार म्हणाले अनिल देशमुख यांच्या प्रत्येक क्षणाची शिक्षा दिली जाईल. पण त्यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनीच जेलमध्ये टाकलं. ही धमकी कुणाला देता, धमक्यांची सिरीज सुरु करा. २३ जणांची चौकशी सुरु आहे. त्यात अनिल परब, हसन मुश्रीफ, भावना गवळीही आहेत. आज मी अर्जुन खोतकर यांचं नाव घेत आहे. अर्जुन खोतकर यांनी १०० कोटींचा घोटाळा केला. त्याची तक्रार आयकर विभाग आणि ईडीकडे तक्रार केलीय. अर्जुन खोतकर यांनी रामनगर कारखाना बेनामी पद्धतीने फसवून घेतला आहे. मुळे आणि तापडियाकडे ज्या धाडी पडल्या त्या खोतकर यांच्याशी संबंधितच होत्या, असा दावा सोमय्या यांनी केलाय.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे सहकारीच असे घोटाळे करु शकतात. मुळे, तापडिया आणि खोतकरांनी मिलिभगत करुन हा कारखान्याचा घोटाळा केलाय. कारखान्याची १०० एकर जमीन हडप करण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्या जमिनीवर कॉम्प्लेक्स बांधण्याचा प्रयत्न सुरु आहे. अर्जुन खोतकर यांची १०० कोटीचा कारखाना आणि १ हजार कोटींच्या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या घोटाळ्याची चौकशी सुरु झाली असल्याचं सोमय्या म्हणाले. तसंच शरद पवार यांचा ईडी अधिकारी, आयकर विभागाचे अधिकारी, हायकोर्ट आणि भाजपला धमकी देण्याचा उद्देश होता, असा आरोपही सोमय्या यांनी केलाय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button