फडणवीसांकडे बॉम्ब नव्हता, तो वात नसलेला फुसका फटाका होता; संजय राऊतांची खोचक टीका
नवी दिल्ली: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत बॉम्ब घेऊन आले होते. पण तो भिजलेला लवंगी फटका निघाला. त्याला वातही नव्हती, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांची खिल्ली उडवली. अनिल देशमुख हेच राज्याचे गृहमंत्री राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांना दिलेल्या बदल्यांच्या रॅकेटच्या अहवालाची अक्षरश: खिल्ली उडवली.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या बदल्यांच्या रॅकेट प्रकरणाची खिल्ली उडवली. दिल्लीत महाराष्ट्राच्या नेत्यांनी येत राहिलं पाहिजे. दिल्लीवर महाराष्ट्राचा प्रभाव असला पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते काल दिल्लीत आल्याचं कळलं. काही कागद घेऊन ते आले होते. ते कागदपत्रं काही गंभीर नव्हते. ते गंभीर आहेत की नाही हे सरकार ठरवेल. विरोधी पक्षनेत्याने गृहसचिवांना दिलेल्या अहवालात काडीचाही दम नाही. तो अहवाल जाहीर करण्यात यावा. तो नीट वाचा. त्यात सरकारला अडचणीत आणेल असं काहीच नाही. सरकारने काही चुकीचं केलं अशी एकही ओळ नाही, असं राऊत म्हणाले.
राज्यात जुन्या सरकारवर निष्ठा ठेवणारे काही अधिकारी असू शकतात. त्यांनी काही सहेतूने ती कागदपत्रं बनवली असतील, असा चिमटा काढतानाच विरोधी पक्षनेते काल बॉम्ब घेऊन आले होते. पण तो भिजलेला लवंगी फटाका होता. त्या फटाक्याला वातही नव्हती. आम्ही शोधत होतो हा बॉम्ब कुठे तरी फुटेल. पण त्यात दमच नव्हता. त्यामुळे तो फुटलाच नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
बंगालमध्ये निवडणुका सुरू आहेत. बंगालमध्ये खेला होबे सुरू आहे. तसंच महाराष्ट्र आणि दिल्लीत खेला होबे सुरू आहे. त्यामुळे राज्यातील जनतेचं मनोरंजन चांगलं होतं आहे. त्यावर मनोरंजन टॅक्सही देण्याची गरज नाही. टॅक्स फ्री आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
कोणत्याही अधिकाऱ्याचं आक्षेपहार्य संभाषण झालं असेल तर ते तपासायला मुख्यमंत्री सक्षम आहेत. त्यासाठी दिल्लीत जायची गरज नाही. विरोधी पक्षनेत्याने डेटाफाटा घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटावं. पुढचा शब्द मी सांगत नाही. या आपल्या घरातील गोष्टी असतात. त्या दिल्लीत जाऊन सांगायच्या नसतात. दिल्लीत असे भिजलेले फटाके वारंवार वात लावून फोडण्याची सवय आहेच, असा चिमटाही त्यांनी काढला.
आता विरोधकांचा कोणता सिनेमा बनतो आणि पडतो हे पाहायचे आहे. ज्या परमबीर सिंग यांच्या पत्रावरून गोंधळ सुरू आहे. त्याच सिंगांच्या आग्रहावरून सीबीआयला महाराष्ट्रात बंदी घातली आहे. पण परमबीर सिंगच सीबीआय चौकशीसाठी कोर्टात गेले आहेत. फडणवीस सुद्धा सीबीआय चौकशीसाठी दिल्लीत आले आहेत, असंही ते म्हणाले.
उत्तर प्रदेशात वैभव कृष्ण नावाच्या अधिकाऱ्याने योगी सरकारच्या बदल्याचं रेटकार्डच दिलं होतं. 50 लाखांपासून एक कोटीची मागणी बदल्यांसाठी केली जात आहे, असल्याचं वैभव कृष्ण यांनी म्हटलं होतं. त्यावर केंद्राकडे कोणी गेलं नव्हतं. विरोधी पक्षानेही सरकारविरोधात केंद्रात तक्रार केली नव्हती. त्यामुळे अशा पत्रांचं काय होतं हे विरोधी पक्षनेत्यांना कळायला हवं. मी असे दहा पत्रं देऊ शकतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.
सरकारमध्ये काही ठिकाणी भोकं पडली आहेत. माहिती जाण्यायेण्याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. ते अधिकारी कोण आहेत हे शोधावं लागेल, असं सांगतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे योग्यवेळी बाहेर येतील. जेव्हा येतील तेव्हा तोफगोळे आणि बॉम्ब घेऊन फिरणाऱ्यांमध्ये काहीच दम नसल्याचं स्पष्ट होईल, असंही ते म्हणाले. तसेच खरं तर या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी बोलण्याची काहीच गरज नाही, त्यात बोलण्यासारखं काय आहे, असा सवालही त्यांनी केला.
भाजपचे काही कार्यकर्ते प्रशासनात, तर काही राजभवनात
भाजपचं शिष्टमंडळ आज राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांची राजभवानात जाऊन भेट घेतली. यावरुन शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. आज जे कोणाकोणाला भेटले आहेत ते भाजपचे कार्यकर्ते आहेत. कोणी प्रशासनात आहेत, कोणी राजभवनात आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. राज्यपाल हे कार्यकर्ते आहेत. कालपर्यंत संघाचे प्रचारक होते, भाजपचे मुख्यमंत्री होते, असा निशाणा संजय राऊत यांनी लगावला.
भाजपचे काही कार्यकर्ते प्रशासनात आहेत, तर काही राजभवानात आहेत. त्यामुळे त्यांना भेटू द्या. ती त्यांच्या घरातली गोष्ट आहे. राज्यपाल हे देखील कालपर्यंत संघाचे प्रचारक होते, भाजपचे मुख्यमंत्री होते, केंद्रात मंत्री होते. मग कार्यकर्ता बोलणं हा अपमान आहे का? असा उपहासात्मक सवाल देखील केला. राज्यपाल हे संविधानिक पदावर आहेत. यावर बोलताना राज्यपाल महोदयांना त्यांच्या पदाचा मान राखायला हवा असं जर वाटत असेल तर त्यांनी संविधानिक पद्धतीने काम करायला हवं. आमच्या राज्यपाल नियुक्ती १२ आमदारांच्या नावांना का मंजूरी दिली जात नाही आहे? असा सवाल राऊत यांनी केला.