Top Newsराजकारण

उस्मानाबादेत नवाब मलिक कुटुंबाची १५० एकर जमीन; भाजपचा आरोप, ईडी चौकशीची मागणी

उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक हे ३ मार्चपर्यंत ईडी कोठडीत असणार आहेत. दाऊदशी संबंधित जमीन खरेदीत मनी लॉन्ड्रिंगचा आरोप त्यांच्यावर आहे. अशावेळी भाजपकडून मलिकांवर अजून एक गंभीर आरोप करण्यात आलाय. ‘मलिक यांच्या कुटुंबाच्या नावाने उस्मानाबाद तालुक्यातील जवळा येथे १५० एकर जमीन आहे. इतकी जमीन खरेदी करण्यासाठी मलिक कुटुंबाकडे पैसा कुठून आला? याची चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केली आहे. ही जमीन सिलिंगची होती, मात्र ती खरेदी करताना कोणतीही परवानगी घेतली नाही. तसंच एका कुटुंबाला इतक्या मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी करता येत नसताना ती नियमबाह्य रित्या खरेदी केल्याचा आरोपही काळे यांनी केला आहे.

उस्मामाबाद सारख्या ग्रामीण भागात तब्बल १५० एकर जमीन घेण्याचे प्रयोजन काय? यासह जमीन खरेदी करताना मूल्यांकन कमी दाखवून खरेदी खत केले आणि सरकारचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला. शेतकरी नसताना मलिक कुटुंबाने जमीन खरेदी केली, अशा अनेक बाबी संशयास्पद आहेत. ईडीने या प्रकरणाचीही चौकशी करावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आलीय. मलिक यांची पत्नी, मुलगी आणि मुलगा यांच्या नावे असलेली ही जमीन ८ वर्षांपासून पडिक आहे.

नवाब मलिक यांची पत्नी मेहजबीन नवाब मलिक, मुलगी सना नवाब मलिक, निलोफर समीर खान, अमीर नवाब मलिक, फराज नवाब मलिक आणि बुश्रा फराज या नावाने २० डिसेंबर २०१३ रोजी जमीन खरेदी करण्यात आली. ही जमीन बागायती असताना जिरायती दाखवून मूल्यांकन १ कोटी २० लाखाने कमी केले. त्यामुळे सरकारचा मोठा महसूल बुडाला आहे. कागदोपत्री २ कोटी ७ लाखाला जमीन खरेदी केल्याचं नमूद करण्यात आलं. मात्र, प्रत्यक्षात जमीन खरेदी करताना जास्त रक्कम दिली असल्याचा आरोप भाजपने केला आहे. या जमिनीवर शेततळे आहे. त्यामुळे ती जमीन बागायती आहे. तसंच या जमिनीवर अलिशान बंगला असताना त्याचं मुल्यांकन खरेदी करताना दाखवण्यात आलं नाही. त्यामुळे सरकारची मोठी फसवणूक केल्याचा आरोप भाजपनं केलाय.

दीडशे एकर जमीन खरेदीसाठी पैसा कुठून आला?

दीडशे एकर जमीन खरेदी करताना मलिक कुटुंबाकडे इतका पैसा कुठून आला? असा सवाल करतानाच हा पैसा बेनामी असल्याचा आरोप भाजपने केलाय. ईडीने या जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष नितिन काळे यांनी केली आहे. मलिक कुटुंबाच्या नावाने राज्यात अनेक ठिकाणी जमीन आहे. त्यासाठी पैसा कुठून आला याची चौकशी करण्यात यावी, असंही काळे म्हणाले. दरम्यान, मलिक कुटुंबाच्या नावावर असलेली जमीन सध्या पडिक आहे आणि या जमिनीवर सध्या लखनौ येथील वॉचमन देखरेखीचं काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button