सचिन सावंतांना पोटशूळ का? केशव उपाध्ये यांचा हल्लाबोल
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी बुधवारी इशारा दिल्यानंतर आज ट्विटरवरुन भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना काही प्रश्न विचारलेत. त्यावर आता भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सचिन सावंत आणि पर्यायानं महाविकास आघाडीवर पलटवार केलाय.
‘मराठा समाजाने कोल्हापूरला ज्या संस्थेविरोधात आंदोलन केले त्या मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात निकराने विरोध करणाऱ्या #SaveMeritSaveNation संस्थेची स्थापना भाजपाच्या इशाऱ्यावर नागपूर येथे 2019/20 मध्ये करण्यात आली का? या संस्थेचे विश्वस्त नागपूरचे असून भाजपा आणि संघाशी संबंधित आहेत. एके ठिकाणी मराठा आरक्षण मिळाले पाहिजे असा देखावा करायचा व दुसरीकडे आपल्याच कार्यकर्त्यांना न्यायालयात विरोध करायला सांगायचे? भाजपानेच मराठा आरक्षणाविरोधातील न्यायालयीन लढाईला रसद पुरवली का? अनुप मरार कोण आहे? संघ कनेक्शन काय? याचे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील व फडणवीस यांनी द्यावे’, असं आव्हान सावंत यांनी दिलंय.
मराठा आरक्षणविरोधी याचिकांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांनी आर्थिक रसद पुरवली. आता आरक्षण घालविल्यानंतर मराठा समाजाला न्याय देण्यासाठी कुणी आंदोलन करीत असेल तर त्याला घाबरून निव्वळ अफवा पसरविण्याचे उपटसुंभ धंदे सचिन सावंत यांनी बंद करावे, असं केशव उपाध्ये यांनी म्हटलंय.
‘सेव्ह मेरिट सेव्ह नेशन’ला कोणकोणत्या नेत्यांनी देणग्या दिल्या, याचीही माहिती आहेच. त्यामुळे निव्वळ अफवा पसरविण्याचा आपला छंद सचिन सावंत यांनी किमान या संवेदनशील विषयात तरी जपू नये. मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील विषयात त्या समाजाशी असा पोरखेळ करण्याचा कोणताही अधिकार सचिन सावंत यांना नाही. मुळात गेली 60 वर्ष जो प्रश्न तुम्ही खितपत ठेवला, ते मराठा आरक्षण मिळवून देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. एवढेच नाही तर ते उच्च न्यायालयात टिकविले सुद्धा. पण, सर्वोच्च न्यायालयात निव्वळ तारखा मागायच्या, गायकवाड आयोगाच्या परिशिष्टांचे भाषांतरच सादर करायचे नाही असे प्रकार याच सरकारने केले आणि त्यामुळे प्रचंड परिश्रमाने मिळविलेले आरक्षण घालविण्यात आले’, असा टोला उपाध्ये यांनी लगावलाय.
आता मराठा समाजासोबत ठामपणे उभे राहण्याचा निर्णय भाजपाने घेतला, तर त्यात सचिन सावंतांना पोटशूळ का उठावा? मराठा समाजासोबत आम्ही सत्तेत असतानाही होतो आणि यापुढेही राहू. स्वत: करायचं काही नाही आणि दुसर्यांच्या पायात पाय टाकायचे, हीच काँग्रेस पक्षाची कायम संस्कृती राहत आली आहे. स्वत:च्या पक्षांतर्गत सवयी किमान बाहेरच्या बाबतीत तरी त्यांनी वापरू नये. मराठा आरक्षणविरोधी याचिकांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांनी आर्थिक रसद पुरविली होती. भाजपाला सुपर स्प्रेडर म्हणताना आपल्या पक्षाने या देशाला किती कीड लावून ठेवली, याचे आत्मचिंतन सचिन सावंत यांनी केले, तर कदाचित त्यांना लवकर बोध होईल. अन्यथा थापा आणि अफवा याच विश्वात ते रममाण राहतील, अशी जोरदार टीका उपाध्ये यांनी केलीय.