राजकारण

सचिन वाझेंना शिवसेनेत आणणारा नेता कोण; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल; अनिल देशमुख यांचा राजीनामाच हवा

मुंबई : ख्वाजा युनूस प्रकरणात 17 वर्षे निलंबित असलेल्या सचिन वाझे (Sachin Vaze) यांना शिवसेनेत कोणी आणलं, त्यांना शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी नेणारी ती व्यक्ती कोण होती, असा सवाल मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपस्थित केला. भाजप आणि शिवसेनेचे सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे यांना पुन्हा पोलीस सेवेत घेण्याची विनंती केली होती, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते. याचा अर्थ सचिन वाझे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अत्यंत जवळचा माणूस आहे, याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची सचिन वाझे प्रकरणी बदली करण्यात आली आहे. मात्र, जर परमबीर सिंग यांचा वाझे यांच्याशी संबंध असेल तर त्यांची बदली का केली. त्यांचा जर या प्रकरणात संबंध असेल तर त्यांची चौकशी का केली नाही, असाही सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. याबाबत सरकारने अद्याप उत्तर दिलेले नाही. याचा अर्थ आपल्या काही अंगाशी आलं का ते झटकून टाकने, असाच होतो, असे म्हणत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुंबईतील पोलीस अधिकाऱ्याला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटींचं टार्गेट दिलं होतं. राज्यात अनेक शहरं आहेत. त्यात अनेक पोलिस आयुक्त आहेत. त्यांना कितीचं टार्गेट देण्यात आलं? असा सवाल करतानाच या प्रकरणाचा केंद्र सरकारने तपास करावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

मुंबईत रविवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी अंबानी स्फोटक प्रकरण कल्पनेपेक्षा अधिक धक्कादायक असल्याचा दावा केला. त्यासाठी हे प्रकरण फक्त सचिन वाझे आणि परमबीर सिंग यांच्यापुरते मर्यादित राहता कामा नये. हा विषय दुसरीकडे भरकटता कामा नये. त्यासाठी केंद्र सरकारने याप्रकरणात हस्तक्षेप करुन त्याची कसून चौकशी करावी. ही चौकशी खरंच नीटपणे पार पडली तर अक्षरश: फटाक्याची माळ लागेल. या सगळ्यात कोण कोण आत जाईल, याची कल्पनाही आपण करू शकत नाही. या सगळ्यात अनेक धक्कादायक चेहरे समोर येतील, असा दावा राज ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरे आणि अंबानींचे मधुर संबंध, मग पोलीस खंडणी कशाला वसूल करतील?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांचे मधुर संबंध सर्वश्रूत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शपथविधीला अंबानी व्यासपीठावर उपस्थित होते. मग असे असताना पोलीस अंबानी यांच्याकडे पैसे मागायची हिंमत कशी करू शकतील? अंबानी यांच्या घराखाली कोणाला सांगितल्याशिवाय एखादा पोलीस अधिकारी बॉम्ब कसा ठेवेल? कोणाच्या सूचना असल्याशिवाय पोलीस असं धाडस करणार नाहीत, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त असतो. या सुरक्षाकड्यात इस्रायली लोकांचाही समावेश आहे. याशिवाय, मध्य प्रदेशचे पोलीसही अंबानी यांच्या दिमतीला आहेत. ते याठिकाणी का आहेत, हे कोडे अद्याप मला उलगडलेले नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

यापूर्वी अतिरेकी बॉम्ब ठेवतात असं ऐकलं होतं. आता पोलीसच बॉम्ब ठेवत असल्याचं उघड झालं आहे. ही धक्कादायक बाब आहे. कुणाच्या तरी सांगण्यानुसार वाझे हे कृत्य करतील का? पोलिसांना कुणाच्या तरी सूचना असल्याशिवाय पोलीस हे धाडसच करणार नाही, असंही ते म्हणाले. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. ते केवळ पोलीस दलातील वादाशी संबंधित नाही. तर बॉम्ब ठेवण्यापर्यंतचं हे प्रकरण आहे. त्यामुळे केंद्राने यात हस्तक्षेप करावा. केंद्राने याची चौकशी करावी. महाराष्ट्र सरकार या प्रकरणाची योग्य चौकशी होणार नाही. केंद्राने चौकशी चौकशी केली तर या प्रकरणात फटाक्याची माळ लागेल. अनेक अनाकलनीय चेहरे समोर येतील, असं सांगतानाच या प्रकरणात कोणकोण आत जातील याची कल्पनाही कोणाला करता येणार नाही. केंद्राने जर हस्तक्षेप केला नाही तर राज्य अराजकाकडे जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

सरकार बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट लागू करा हे राजकीय मुद्दे आहेत.ह्यात आत्ता नको पडूया. ह्याची चौकशी व्यवस्थित होऊद्या. कारण चौकशी व्यवस्थित झाली नाही तर उद्या प्रत्येकाच्या घराबाहेर अशा गाड्या उभ्या राहतील.पोलिसांना हे कृत्य करायला लावणारे कोण हे आधी कळू द्या, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button