अर्थ-उद्योग

अनिल अंबानींना मोठा झटका; १६० कोटींचे कर्ज ‘फ्रॉड’ जाहीर

मुंबई: कर्जाच्या विळख्यात सापडलेले उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. कारण, कर्नाटक बँकेकडून रिलायन्स होम आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स या कंपन्यांनी घेतलेले १६० कोटींचे कर्ज फ्रॉड असल्याचे जाहीर केले आहे. रिझर्व्ह बँकेला यासंदर्भात सूचित करण्यात आले असून त्यामुळे अनिल अंबानी यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

कर्नाटक बँकेने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही २०१४ पासून रिलायन्स समूहातील या दोन कंपन्यांसोबत काम करत आहोत. रिलायन्स फायनान्सच्या मल्टिपल बँकिग व्यवस्थेत आमचा ०.३९ टक्के तर रिलायन्स कमर्शियल फायनान्समध्ये १.९८ टक्के इतका हिस्सा आहे. दोन्ही कर्जांसाठी १०० टक्के तरतूद करण्यात आली आहे. तसेच दोन्ही कर्जाची खाती बुडीत खाती म्हणून नोंदवण्यात आली होती. त्यामुळे बँकेच्या आर्थिक स्थितीवर कोणताही परिणाम होणार नाही, असे कर्नाटक बँकेकडून सांगण्यात आले.

उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स होम फायनान्स कंपनीला खरेदीदार मिळाल्याची माहिती समोर येत आहे. एथॅम इन्व्हेस्टमेंट अँण्ड इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेडने रिलायन्स होम फायनान्स कंपनी खरेदी करण्यासाठी २,८८७ कोटी रुपये मोजण्याची तयारी दर्शविली आहे. हा व्यवहार अंतिम टप्प्यात असून लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा होऊ शकते.

अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहावर बँकांचे हजारो कोटींचे कर्ज आहे. त्यामुळे हा व्यवहार पार पडल्यास बँक ऑफ बडोदाच्या नेतृत्वाखालील बँकांच्या समूहाला २,८८७ कोटी रुपये मिळतील. सूत्रांच्या माहितीनुसार, एथॅम इन्व्हेस्टमेंट अँण्ड इन्फ्रास्ट्रक्टर लिमिटेड सुरुवातीला ९० टक्के म्हणजे २,५८७ कोटी रुपये जमा करेल. त्यानंतर उर्वरित ३०० कोटींची रक्कम वर्षभरात टप्प्याटप्याने जमा केली जाईल.

रिलायन्स इन्फ्रावरील कर्जाचा बोजा कमी होणार

अनिल अंबानी समूहातील रिलायन्स पॉवर या कंपनीकडून Reliance Infrastructure कंपनीला १३२५ कोटी रुपयांचे शेअर्स आणि वॉरंट जारी करण्यात येणार आहेत. यामध्ये ५९.५ कोटी प्रिफेन्शियल शेअर्सचा समावेश आहे. रिलायन्स पॉवरकडून रविवारी शेअर बाजार नियमकांना याबद्दलची माहिती देण्यात आली.

१३ जून रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रिलायन्स पॉवर १० रुपयांच्या इश्यू प्राईसने रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला ५९.५ कोटी इक्विटी शेअर्स देईल. तसेच ७३ कोटी रुपयांचे वॉरंटसही इश्यू करण्यात आले आहेत. त्यामुळे रिलायन्स पॉवरच्या डोक्यावरीक कर्जाचा भार १३२५ कोटी रुपयांनी कमी होणार आहे. चालू आर्थिक वर्षात रिलायन्स पॉवरचे एकत्रित कर्ज ३२०० कोटी रुपयांपर्यंत कमी होणार आहे. तसेच नव्या समभागांमुळे रिलायन्स पॉवर कंपनीत रिलायन्स इन्फ्रा आणि अन्य प्रवर्तकांची भागीदारी २५ टक्क्यांपर्यंत वाढेल. रिलायन्स इन्फ्राच्या आठ लाख शेअरधारकांना याचा फायदा मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button