नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार आणि गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी या महिन्याच्या अखेरीपर्यंत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसशी संबंधित सूत्रांनी ही माहिती दिली. सूत्रांनी सांगितले की, जर पंजाब काँग्रेसमध्ये सुरू असलेली उलथापालथ पुढच्या काही दिवसांमध्ये पूर्णपणे संपुष्टात आली तर कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी हे २८ सप्टेंबर रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुजरात प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल या दोन्ही नेत्यांमध्ये आणि काँग्रेसच्या पक्षनेतृत्वाशी मध्यस्थी करत आहेत. काँग्रेसमधील एका सूत्राने सांगितले की, जर पंजाब काँग्रेसमधील राजकीय पेच हा पूर्णपणे निवळला तर कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवानी २८ सप्टेंबर रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात.
मुळचा बिहारमधील असलेला कन्हैया कुमार जेएनयूमध्ये झालेल्या कथित देशविरोधी घोषणाबाजीमुळे चर्चेत आला होता. त्याने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत बेगुसराय येथून भाजपा नेते गिरिराज सिंह यांना आव्हान दिले होते. मात्र तिथे त्याचा दारुण पराभव झाला होता. दुसरीकडे मागासवर्गीयांचे राजकारण करणाऱ्या जिग्नेश मेवानीने २०१७ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये गुजरातमधील वडगाम विधानसभा मतदारसंघामधून विजय मिळवला होता.