रश्मी ठाकरेंबद्दल वादग्रस्त ट्विट प्रकरणी भाजपच्या जितेन गजारियांचा माफीनामा
साडेपाच तासांच्या चौकशीनंतर सुटका; पुण्यात गुन्हा
मुंबई : रश्मी ठाकरेंबद्दल वादग्रस्त ट्विट प्रकरणी जितेन गजारियांनी माफीनामा सादर केल्यानंतर साडेपाच तासांच्या चौकशीनंतर त्यांची सुटका करण्यात आली. गजारीया हा भाजपचा पदाधिकारी आहे.
दरम्यान, गजारीयाच्या ट्विटनंतर शिवसेनेच्या महिला नेत्यांनीही भाजपवर चांगलीच टीकेची झोड उठवली. रश्मी ठाकरेंवर अशा प्रकारची टीका होणे निंदनीय असल्याचे शिवसेनेच्या महिला नेत्यांनी म्हटले आहे. भाजपने अशी माणसं पगार देऊन ठेवली असल्याची टीका शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी केली होती.
रश्मी ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केल्याप्रकरणी गजारियांची मुंबई पोलीस सायबर सेलकडून साडेपाच तास चौकशी करण्यात आली. आक्षेपहार्य २ ट्विटच्या संदर्भात सायबर सेलच्या डीसीपी रश्मी करंदीकर यांनी जितेंद्र गजारीया याचा संपूर्ण जबाब नोंदवलेला आहे. पोलिसांना जे काही सहकार्य लागेल ते आम्ही त्यांना करू मात्र ही सरकारची दडपशाही असल्याचा आरोप जितेन गजारियांच्या वकिलांनी केला आहे. रश्मी ठाकरे यांच्याबद्दल ट्विटरवर मराठी राबडी देवी असे ट्विट गजारीयाने केले होते. त्यानंतर गजारीयाला ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी गजारियांनी माफीनामा सादर केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीवरुन गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून सतत टीका होत आहे. गेल्या अधिवेशनातही भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर बरीच टीका केली होती. मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी वाटून द्यावी असे फडणवीस म्हणाले होते, तर मुख्यमंत्र्यांचा मुलावर विश्वास नसेल तर रश्मी वहिनींना चार्ज द्यावा अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती.
पुण्यातही गजारीया विरोधात गुन्हा दाखल
रश्मी ठाकरे यांच्याबद्दल बदनामीकारक ट्विट करणाऱ्या जतिन गजारीया विरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. शिवसेनेचे उप शहर संघटक उमेश वाघ यांनी गजारीया विरोधात तक्रार दाखल केली आहे. गजारीया विरोधात कलम १५३ अ, ५०० (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस पुढील तपास करत आहेत.