
डरबन : पहिल्या कसोटी सामन्यात दमदार विजय मिळवल्यावर भारतीय संघाकडून आशा वाढलेल्या होत्या. पण दक्षिण आफ्रिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांचे आज काहीच चाललं नाही. फक्त ते कागदी शेर ठरले. भारताचा पहिला डाव २०२ धावात आटोपला. कर्णधार के. एल. राहुल (५०) आणि अश्विनच्या (४६) धावा या दोघांव्यतिरिक्त अन्य फलंदाज फक्त हजेरीवीर ठरले. कोणीही दीर्घकाळ खेळपट्टीवर टिकून धावा जमवल्या नाहीत. राबाडा-ओलिवरने प्रत्येकी तीन आणि मार्को जॅनसेनने चार गडी बाद केले.
जोहान्सबर्गच्या वाँडर्स स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याला आज सुरुवात झाली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या कसोटीआधी भारताला मोठा धक्का बसला. विराट कोहलीने पाठीच्या दुखण्यामुळे या सामन्यातून माघार घेतली आहे. विराटच्या जागी उपकर्णधार लोकेश राहुलकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विराटच्या जागी हनुमा विहारीला संघात स्थान देण्यात आले आहे. वाँडर्सची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साथ देणारी असल्यामुळे शार्दुल ठाकूरच्या जागी उमेश यादवचा संघात समावेश केला जाईल, असे बोलले जात होते. पण विराट कोहली वगळता विजयी संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
या सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय फलंदाजांनी हाराकिरी पत्करली आणि त्यामुळेच भारताला डाव २०२ धावांवर संपुष्टात आला. भारताचा हंगामी कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्विकारली. त्यानंतर काही काळ राहुल आणि मयांक अगरवाल यांच्याकडून चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. या दोघांनी ३६ धावांची सलामी दिली आणि त्यानंतर मयांक अगरवालच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला. मयांक बाद झाल्यावर भारताला एकामागून एक अजून दोन मोठे धक्के बसले. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे दोघेही एकाच धावसंख्येवर बाद झाले आणि भारतीय संघाला मोठा हादरा बसला. अजिंक्यला यावेळी भोपळाही फोडता आला नाही, तर पुजाराला तीन धावाच करता आल्या. त्यानंतर या सामन्यात पहिल्यांदाच संधी मिळालेले हनुमा विहारी फलंदाजीला आला, पण त्यालाही मोठी खेळी साकारता आली नाही.
या धक्क्यांमधून भारतीय संघाला सावरण्याचे काम कर्णधार राहुल करत असल्याचे पाहायला मिळाले. राहुलने यावेळी अर्धशतक झळकावत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. राहुलकडून यावेळी मोठ्या खेळीची अपेक्षा होती. पण अर्धशतक झळकावल्यावर राहुलला एकही धाव करता आली नाही. राहुलचा महत्वाचा बळी यावेळी मार्को जॅनसेनने घेतला आणि संघाला मोठे यश मिळवून दिले. राहुलला यावेळी ९ चौकारांच्या जोरावर ५० धावा करता आल्या. राहुल बाद झाल्यावर रिषभ पंतही जास्त काळ खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. पंतला यावेळी १७ धावांवर समाधान मानावे लागले. पण यावेळी आर. अश्विन हा संघाच्या मदतीसाठी धावून आल्याचे पाहायला मिळाले. राहुल, पंत आणि त्यानंतर शार्दुल ठाकूरही बाद झाले असले तरी अश्विन मात्र खेळपट्टीवर ठाण मांडून होता. पण अखेर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. अश्विनने ५० चेंडूंमध्ये ६ चौकारांच्या जोरावर ४६ धावांची खेळी साकारली.




