Top Newsराजकारण

राज ठाकरे दिवाळीनंतर रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. कांचनगिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी आज राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’वर भेट घेतली. या भेटीत राज ठाकरे यांनी अयोध्येला येण्याची बाबतची इच्छा कांचनगिरीजी यांना बोलून दाखवली. कांचन गिरीजी यांनी राज यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यातही त्यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची माहिती दिली.

राज ठाकरे यांचा डिसेंबर महिन्यात अयोध्येत येण्याचा मानस आहे. आम्ही त्यांचं स्वागत करु. राज ठाकरे यांनी हिंदू राष्ट्र मजबूत करण्यासाठीच्या कार्याला हातभार लावावा अशी विनंती आम्ही त्यांच्याकडे केली आहे. राज ठाकरे यांची हिंदू राष्ट्राबाबतची संकल्पना खूप स्पष्ट आहे, असं कांचनगिरीजी यांनी म्हटलं.

राज ठाकरे यांनीही अयोध्येला जाण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात असून दिवाळीनंतर ते अयोध्या दौरा करण्याची शक्यता आहे. डिसेंबर महिन्याच्या ५ तारखेला राज ठाकरेंचा अयोध्या दौरा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. हिंदू राष्ट्र मजबूत करण्यासाठी राज ठाकरेंचा अयोध्या दौरा अतिशय महत्त्वाचा आहे, असं सांगितलं जात आहे.

दरम्यान, कांचनगिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्यची यांनी राज ठाकरे यांची भेट घेण्यापूर्वी शिवाजी पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर ते कृष्णकुंजवर दाखल झाले. राज ठाकरेंच्या भेटीनंतर कांचन गिरीजी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज ठाकरे यांच्या मनात परप्रांतियांविरोधात कोणताही द्वेष नाही हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवलं, असं कांचन गिरीजी म्हणाल्या. राज ठाकरेंच्या हिंदू राष्ट्राच्या संकल्पना खूप स्पष्ट आहेत आणि स्थानिक रोजगाराच्या मुद्द्यांवर ते बोलत असतात. परप्रांतियांबद्दल कोणत्याही पद्धतीचा द्वेष मला त्यांच्या बोलण्यातून जाणवला नाही, असं त्या म्हणाल्या.

उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं नाव बुडवलं : कांचनगिरी

राज ठाकरे यांच्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची छबी दिसते असं सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचं नाव बुडवलं अशी टीका साध्वी कांचन गिरी यांनी केली आहे. साध्वी कांचन गिरी मुंबईत आल्या आहेत. काल त्यांनी मीडियाशी संवाद साधताना राज ठाकरेंची स्तुती करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला आहे. उद्धव ठाकरेंबाबत मला काही बोलायचं नाही. त्यांनी त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांचं नाव बुडवलं आहे. बाळासाहेब जे बोलायचे ते करत होते. ते प्रखर हिंदुत्ववादी होते. हिंदूंसाठी ते वाघासारखी डरकाळी फोडायचे, असं कांचन गिरी म्हणाल्या.

उद्धव ठाकरेंवर मी नाराज आहे. त्यांनी मुस्लिमांसोबत जाऊन पक्ष बनवला आहे, असं सांगतानाच पालघरमध्ये हत्याकांड झालं तेव्हा उद्धव ठाकरे यांनी आपले कान आणि डोळे बंद केले होते, असी टीकाही त्यांनी केली.

यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्यावर स्तुती सुमने उधळली. राज ठाकरे आक्रमक नेते आहेत. त्यांच्यात बाळासाहेबांची छबी दिसते. तेच बाळासाहेबांचा संकल्प पूर्ण करतील असं सांगतानाच उत्तर भारतीयांबाबत राज यांच्या मनात पूर्वग्रह निर्माण झाला आहे. तो दूर करण्यासाठीच मी मुंबईत आले आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

गुरु माँ कांचन गिरी या जुना आखाड्याशी संबंधित आहेत. त्या महिला संत म्हणून प्रसिद्ध आहेत. त्या दिल्लीच्या सेक्टर-5 मधील वैशाली येथे राहतात. त्यांनी मधल्या काळात देश बचाओ आंदोलन सुरू केलं होतं. हिंदू राष्ट्र व्हावं म्हणून त्यांनी देशभर दौरे सुरू केले आहेत. महाकाल मानव सेवा समितीच्या बॅनरखाली त्यांनी हे अभियान सुरू केलं आहे. त्यांनी देशातील अनेक भागात हिंदूराष्ट्र स्थापन्याचे बॅनर्स आणि पोस्टर्स लावले आहेत. हिंदुराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात उतरावी म्हणून त्यांनी महाराष्ट्र, मध्यप्रदेशासह विविध राज्यातील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button