Top Newsराजकारण

काँग्रेसकडून रजनी पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी;

भाजपकडून राज्यसभा लढण्याची घोषणा

मुंबई : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू अशी ओळख असणाऱ्या माजी खासदार रजनी पाटील यांना पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्याची माहिती आहे. उद्या अर्ज दाखल करण्याचा दिवस आहे. राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. दरम्यान, भाजपकडून संजय उपाध्याय निवडणूक लढणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख तयार केली आहे. सोनिया गांधी यांच्या किचन कॅबिनेट मधील एक नेत्या अशीही त्यांची ओळख आहे. युवा नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक नावे चर्चेत होती. मात्र रजनी पाटील यांना संधी देऊन काँग्रेसने एका महिला नेत्याला संधी दिली आहे. रजनी पाटील या वसंतदादा पाटील यांच्या मानसकन्या असून मूळच्या त्या सांगली जिल्ह्यातल्या. पुढे विवाहानंतर त्या मराठवाड्यात स्थाईक झाल्या. माजी क्रीडा राज्यमंत्री अशोक पाटील यांच्या त्या पत्नी. बीडमधून त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती.

राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची अंतिम तारीख २१ सप्टेंबर आहे. राज्यसभेच्या सात जागांसाठी येत्या ४ ऑक्टोबरला निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या एका जागेसाठी उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेस पक्षातील सहा नेत्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले होते. त्यामध्ये मुकुल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण, गुलाम नबी आझाद, मिलिंद देवरा, उत्तमसिंह पवार, अनंत गाडगीळ यांचा समावेश होता. काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. महाराष्ट्र व अन्य राज्यांतील राज्यसभा जागा जिंकाव्या, असे प्रयत्न भाजपनेही सुरू केले आहेत.

प्रमोद महाजनांच्या निधनानंतर आम्ही उमेदवार दिला नव्हता : थोरात

भाजपने राज्यसभेसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्यावरुन काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर टीका करत एका जुन्या निर्णयाची आठवण करुन दिली आहे. काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेली राज्यसभेच्या जागेसाठी बिनविरोध निवडणूक व्हावी अशी काँग्रेसची इच्छा आहे.

भाजपला विनंती करू

थोरात यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, प्रमोद महाजन यांचं निधन झाल्यानंतर राज्यसभेची निवडणूक लागली होती. पण, महाजन यांच्या जागी उमेदवार न देण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. राजकारणात एखाद्या नेत्याचं निधन झाल्यावर त्या जागी उमेदवार न देण्याची प्रथा आहे, पण भाजपने ही प्रथा मोडली, असं थोरात म्हणाले. भाजपने राज्यसभेच्या उमेदवाराची घोषणा केली, हे योग्य नाही. राजकारणात काही संकेत असतात. तरीही आम्ही भाजपला उमेदवार न देण्याची विनंती करू, असं थोरात म्हणाले.

भाजपकडून राज्यसभा लढण्याची घोषणा

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या जागेबाबत भाजपकडून कोण लढवणार? याबाबतचा सस्पेन्स संपुष्टात आला आहे. भाजपकडून संजय उपाध्याय निवडणूक लढणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. राज्यसभा भाजप लढणार आहे. मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय हे आमचे राज्यसभेचे उमेदवार असतील. २२ तारखेला सकाळी ११ वाजता ते फॉर्म भरायला जाणार आहेत, अशी घोषणा पाटील यांनी केली. संजय उपाध्याय यांच्या राजकारणाची सुरुवात भाजयुमोपासून झाली. काही काळ ते भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीवरही होते. आता ते भाजपचे मुंबई सरचिटणीस आहेत. तसेच उत्तर भारतीयांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपाध्याय यांना राज्यसभेवर पाठवण्याचा भाजपने घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button