
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस. मात्र आपला वाढदिवस कोणीच साजरा करु नका, फलकबाजीही करु नका, राज्य संकटात आहे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. यातच त्यांचे मोठेपण, स्व. बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरेंचे सामाजिक संस्कारच दिसून येतात. त्यांच्या याच संयमी नेतृत्वाची गरज आज अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्राला आहे. कदाचित हीच दूरदृष्टी ठेवून राजकारणातील बाप माणसाने, आदरणीय शरद पवारांनी त्यांच्याकडे राज्याचे नेतृत्व देण्याचा निर्णय घेतला असावा. उद्धवा, सलाम तुझ्या संयमी नेतृत्वाला…!
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून अनपेक्षितपणाने आणि ऐतिहासिक घडामोडी घडल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. राज्यात भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या, मात्र शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करणे त्यांना अशक्यच होते. राष्ट्रवादीत फूट पाडून अजितदादांना सोबत घेत जनेतेची आणि लोकशाहीची फसवणूक करीत पहाटेचा शपथविधी तर देवेंद्र फडणवीसांनी घडवून आणला, पण तो काही तासांचाच ठरला. बिचाऱ्या फडणवीस आणि त्यांच्या जीवावर आपण आता मंत्री होणार म्हणून नवे कोट शिवून, अगदी आता घालू की मग घालू अशा आतुरतेने बसलेल्या अनेकांना काही तासातच आपला पोपट झाल्याचे लक्षात आले. पण हात चोळत बसण्याशिवाय आणि आम्ही पुन्हा येवू,.. आम्ही वेटींगवरच आहोत, राज्य आमच्याकडे द्या असे उसने अवसान आणत दिवस काढण्याची नामुष्की विरोधकांवर आली आहे.
भाजपची खेळी एकीकडे सुरु असताना राज्यात पहिल्यांदाच ऐतिहासिक हातमिळवणी झाली आणि महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले. सरकार स्थापनेपासून काँगेसने कुरबुरु सुरु ठेवल्या असल्या तरी तो त्यांच्यातील तहाचा एक भाग आहे, हे अजूनही विरोधकांना उमगलेले नाही. या संपूर्ण कालावधीत एक गोष्ट प्रकर्षाने सामोरी आली ती म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संयमी नेतृत्व. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि सहा महिन्यात जागतिक महामारीने आपले जाळे विस्तारले. कोरोनामुळे संपूर्ण राज्य अस्वस्थ, हतबल झाले. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात लाखोच्या संख्येने मजुरांची घरवापसी झली. केंद्राने संभाव्य निवडणुका डोळ्यासमोर ठेवत महाराष्ट्र वगळता इतर राज्यांना भरीव पॅकेज देवू केले. राज्याची तिजोरी जेमतेम असतानाही मुख्यमंत्र्यांनी या काळात कदाचित कासवाच्या गतीने असेल पण महाराष्ट्रातील बेरोजगारांना संधी देण्यासाठी अनेक करार, उपाययोजना, मोफत अन्न धान्याचे वाटप, कष्टकऱ्यांना आर्थिक सहाय्य आदींचे नियोजन केले. हे एकीकडे सुरु असताना गतवर्षी अभिनेता सुशांतसिंग राजपुत आत्महत्या प्रकरणात भाजपने थेट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव गोवले. त्या संपूर्ण कालावधीत मर्यादेबाहेर जात ठाकरे घराण्यावर चिखलफेक करण्यात आली. त्यानंतर कंगणा रनौतने भाजपच्या पाठिंब्याने ठाकरेंवर थेट एकेरी वार केले. त्यावेळी अर्धे बॉलिवूड ठाकरेंच्या पाठीमागे, तर अर्धेअधिक अभिनेते कंगनाच्या बाजूने विभागले गेले. अत्यंत मानहानीकारक पद्धतीने राज्याची बदनामी सुरु होती. या काळात ठाकरे कुटुंबीयांनी दाखवलेला संयम सामान्यांसाठी फारच उत्सुकतेचा ठरला. शिवसेनेच्या वर्धापनदिनादिवशी उद्धव ठाकरे यांनी सर्वांनाच योग्य त्या भाषेत सुनावले. त्यानंतर काही प्रमाणात आरोपाची धार शिथिल झाली. कोरोनाकाळात स्वतःची प्रकृती ठीक नसतानाही योग्य ती काळजी घेत मुख्यमंत्री कामकाज पाहत होते, त्यावरही विरोधकांनी टीकास्त्र सुरुच ठेवले. कोरोनावर मात करण्यात मुंबई धारावीने यश मिळवले, त्याचे जगभरात कौतुक झाले, त्याचाही इसाळ भाजपला आलाच. हे मुख्यमंत्र्याचे नाही तर आरएसएसचे यश आहे असे श्रेय घेण्यासाठी राणे पिता-पुत्र पुढे आले. अर्थातच त्यांना विचारतो कोण आणि ऐकतो कोण ते चिपळूणच्या दौऱ्यात कळालेच! कोरोना काळात सर्वाधिक संयमाने परिस्थिती हाताळणारा मुख्यमंत्री म्हणून ठाकरेंना देशात पहिली पसंती मिळाली. त्यावरही राणे पिता-पुत्रांनी टीका केली. एकंदरच सातत्याने एखाद्याचा दवेष करायचा, त्याच्या कर्तबगारीकडे त्याने मिळवलेल्या यशाकडे दुर्लक्ष करायचे, खोटे आरोप करायचे पण रेटून करायचे, यालाच संधीसाधू राजकारण म्हणतात आणि याच वृत्तीने राणे भाजपात असूनही, मंत्रीपद मिळूनही ते कुठेच नाहीत, हे वास्तव आहे. असो.
या दोन अडीच वर्षाच्या कालावधीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या संयमी नेतृत्वाने शिवसेनेचे महत्व वाढवले, पक्ष वाढवला. पक्षातील प्रत्येकाला बळ दिले. प्रसंगी चूक झाली तर त्याच्याकडून मंत्रीपद काढून घेण्याचा बेदरकारपणाही दाखवला. राज्याने या पाच वर्षात सलग दुसऱ्यांदा पूरस्थिती अनुभवली. मागच्यावेळी देवेंद्र फडणवीसांना पुरग्रस्तांच्या भेटीआधी प्रचार दौरे आटोपते घ्यायचे होते. हेलिकॉप्टरमधून त्यांनी पुराची पाहणी केली, पूरग्रस्तांना भेटणे तर दूरच. मुख्यमंत्री ठाकरेंनी किमान चिपळूणमधील नागरिकांशी प्रत्यक्षात संवाद साधला, हे अधिक महत्वाचे आणि दिलासादायक आहे.
सत्तेच्या काळात अनेकांना रंग बदलताना, माज दाखवताना, आपल्या कुटूंबियांसाठी नियम बदलताना राज्याने अनुभवले आहे. मागच्या काळात जे घडत होते ते सर्वांनीच याची देही याची डोळा सहन केले आहे. त्या सर्व परिस्थितीत म्हणूनच उद्धवजी अधिक उजवे आणि अधिक जबाबदार मुख्यमंत्री ठरतात. अत्यंत संयमाने, सर्वंकष विचार करुन सामान्यांना कळेल अशा भाषेत ते संवाद साधतात. उगाचच आपली अभ्यासू वृत्ती लोकांवर लादत फिरत नाहीत, की शब्दांचे खेळ करुन सामान्यांपर्यंत खोटी आकडेवारी देत दिशाभूलही करीत नाहीत. पूरग्रस्तांचे अश्रू पुसताना आधी तुम्ही सुरक्षित रहा, तुमच्या नुकसानीची काळजी करु नका, ज्याचे नुकसान झाले आहे, त्या सर्वांना कोणतीही अडचणी येवू न देता मदत मिळेल, असा दिलासा उद्धव ठाकरेंच देवू शकतात. आज राज्यातील तमाम सामान्यजनांचे ते नेता ठरले आहेत, यात शंका नसावी.