Top Newsस्पोर्ट्स

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या वन डे सामन्यात भारत पराभूत

तिघांच्या अर्धशतकानंतरही मधली फळी कोसळल्याने सामना गमावला

पर्ल : शिखर धवन (८४ चेंडूंत ७९ धावा), विराट कोहली (५१) आणि शार्दूल ठाकूर (नाबाद ५०) या तिघांनी अर्धशतके झळकावूनही बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतावर ३१ धावांनी पराभव पत्करण्याची नामुष्की ओढवली. मधल्या फळीतील फलंदाजांच्या हाराकिरीचा भारताला फटका बसला.

सामनावीर रासी व्हॅन डर दुसेन (९६ चेंडूंत नाबाद १२९ धावा) आणि कर्णधार तेम्बा बव्हुमा (१४३ चेंडूंत ११०) या शतकवीरांनी रचलेल्या द्विशतकीय भागीदारीच्या बळावर आफ्रिकेने ४ बाद २९६ अशी धावसंख्या उभारली. मात्र भारताला ५० षटकांत ८ बाद २६५ धावांत रोखण्यात आफ्रिकेच्या गोलंदाजांना यश आले. या विजयासह आफ्रिकेने तीन लढतींच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. उभय संघांतील दुसरा सामना शुक्रवारी खेळवण्यात येईल.

टेम्बा बवुमा व रॅसी व्हॅन डेर ड्युसेन यांच्या प्रत्येकी शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं २९७ धावांचे लक्ष्य उभे केले. प्रत्युत्तरात शिखर धवन व विराट कोहली यांनी मजबूत पाया रचून दिला होता. पण, ही दोघं माघारी परतली अन् मधल्या फळीनं माती खाल्ली. रिषभ पंत, श्रेयस अय्यर आणि वेंकटेश अय्यर यांच्या अपयशानं भारताला पराभवाच्या दरीत ढकलले. आफ्रिकनं पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. धवन व विराटनंतर भारताकडून शार्दूल ठाकूरनं सर्वाधिक धावांचं योगदान दिलं.

दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या ३ विकेट्स ६८ धावांवर पडल्यानंतर कर्णधार टेम्बा बवुमा व रॅसी व्हॅन डेर ड्युसेन यांनी चौथ्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी केली. टेम्बा बवुमा १४३ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीनं ११० धावांवर लोकेश राहुलच्या हाती झेल देऊन माघारी परतला. बवुमानं चौथ्या विकेटसाठी ड्यूसेनसह २०४ धावांची भागीदारी केली. भारताविरुद्धची आफ्रिकन खेळाडूंची ही दुसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी २००० साली हर्षल गिब्स व गॅरी कर्स्टन यांनी २३५ धावा जोडल्या होत्या. ड्यूसेन ९६ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारासह १२९ धावांवर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेनं ४ बाद २९६ धावांचा डोंगर उभा केला.

लोकेश राहुल व शिखर धवन यांनी पहिल्या विकेटसाठी ४६ धावा जोडल्या. एडन मार्करामनं पहिला धक्का देताना लोकेशला १२ धावांवर माघारी पाठवलं. त्यानंतर विराटनं दुसऱ्या विकेटसाठी धवनसह चांगली भागीदारी केली. विराटनं ९वी धाव घेताच सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडला. त्यानंतर धवननं अर्धशतक पूर्ण केले. विराट व धवन ही जोडी दक्षिण आफ्रिकेसाठी डोकेदुखी ठरताना दिसत होती. टीम इंडियात पुनरागमन करणारा धवन चांगले फटके मारताना दिसला. पण, केशव महाराजचा कमी उसळी घेणारा चेंडू तो हेरू शकला नाही आणि त्याचा त्रिफळा उडला. धवननं ८४ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीनं ७९ धावा केल्या. विराटही चांगला खेळला, पंरतु तब्रेज शम्सीनं त्याला माघारी पाठवले. त्यानंही ६३ चेंडूंत ३ चौकारांच्या मदतीनं ५१ धावा केल्या. धवन व विराटनं दुसऱ्या विकेटसाठी १०२ चेंडूंत ९४ धावांची भागीदारी केली.

रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर या नव्या जोडीवर भारताला विजय मिळवून देण्याची जबाबदारी होती. पंतला ६ धावांवर असताना बवुमाकडून जीवदान मिळालं. पण, त्याचा फार काही उपयोग झाला नाही. श्रेयस अय्यर (१७) व रिषभ (१६) हे भरवशाचे शेवटचे खेळाडू झटपट माघारी परतले. पदार्पणवीर वेंकटेश अय्यर २ धावांवर बाद झाला आणि भारताची अवस्था ६ बाद १८८ अशी झाली. शार्दूल ठाकूर व आर अश्विन ही जोडी अखेरची आशा होती. पण, फेहलुकवायोनं ही जोडी तोडली. आर अश्विन ७ धावांवर माघारी परतला. अखेरच्या १० षटकांत टीम इंडियाला विजयासाठी ९० धावा हव्या होत्या आणि शार्दूल ठाकूर हा एकमेव भरवशाचा फलंदाज मैदानावर होता. पण, दुसऱ्या बाजूनं त्याला साथ मिळाली नाही. भुवनेश्वर कुमार ४ धावांवर माघारी परतला.

शार्दूलनं अखेरपर्यंत संघर्ष केला. त्यानं लुंगी एनगिडीनं टाकलेल्या १८व्या षटकात १७ धावा चोपल्या. लुंगी एनगिडी ( २-६४) तब्रेज शम्सी ( २-५२), अँडीले फेहलुकवायो ( २-२६) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. शार्दूलनं ९व्या विकेटसाठी जसप्रीत बुमराहसह अर्धशतकी भागीदारी केली. शार्दूल ४३ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५० धावांवर नाबाद राहिला. भारताला ८ बाद २६५ धावाच करता आल्या आणि आफ्रिकेनं ३० धावांनी सामना जिंकला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button