
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यात झालेल्या सुरक्षेतील त्रुटींबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही चिंता व्यक्त केली आहे. आज मोदींनी या संदर्भात राष्ट्रपती कोविंद यांची भेट घेतली. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील या त्रुटीबद्दल गंभीर चिंता व्यक्त करत, उपराष्ट्रपतींनी सुरक्षा प्रोटोकॉलचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी कठोर पावलं उचलणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात अशा त्रुटी पुन्हा होणार नाहीत असं म्हटलं आहे. याच दरम्यान आता भारतीय किसान यूनियनचे नेते राकेश टिकैत यांनी प्रतिक्रिया देत मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठीचा एक स्टंट आहे, असं म्हणत जोरदार निशाणा साधला आहे. राकेश टिकैत यांनी, केंद्र सरकार म्हणते की सुरक्षेत त्रुटी होती आणि पंजाब सरकार म्हणते की पंतप्रधान तिथे गेले नाहीत कारण त्यांच्या रॅलीतील खुर्च्या रिकाम्या होत्या. दोघेही केवळ स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. पंतप्रधानांनी तिथे जायला नको होतं, असं म्हटलं आहे. तसेच अशाप्रकारची जी बातमी सुरू आहे की पंतप्रधान वाचले, सुखरूप परतले वगैरे यावरून असं वाटतं की हा पूर्णपणे एक स्टंट आहे.




