कर्नाटकात मुख्यमंत्री बोम्मई यांच्यासह तीन उपमुख्यमंत्री आज घेणार शपथ
बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची कमान कोणाकडे जाणार याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. अखेर बसवराज बोम्मई यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री बोम्मई यांच्यासह कर्नाटकमध्ये तीन उपमुख्यमंत्री देखील शपथ घेणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार आर अशोक, गोविंद करजोल, श्रीरामालु हे तीन नेते उपमुख्यमंत्री होणार असल्याची माहिती आहे. राजभवनमध्ये सकाळी ११ वाजता राज्यपाल थावरचंद गेहलोत सर्वांना शपथ देतील.
आर अशोक हे वोक्कालिंगा समाजातून येतात तर गोविंद करजोल हे एससी समाजातून येतात. तर येडियुरप्पा सरकारमध्ये देखील उपमुख्यमंत्री असलेले श्रीरामालु हे एसटी समाजातून येतात. या तिघांना उपमुख्यमंत्रीपद देत भाजपनं जातीय गणितं देखील साधली आहेत. कर्नाटक भाजप नेते आणि प्रभारी अरुण सिंह यांनी याबाबत सांगितले म्हटलं की, हा निर्णय सर्व आमदारांच्या सर्व संमतीनं घेतला आहे. बोम्मई यांनी गृहमंत्री म्हणून चांगलं काम केलं आहे. आता हे चांगले मुख्यमंत्री म्हणून देखील काम करतील.
बसवराज बोम्मई हे माजी मुख्यमंत्री एसआर बोम्मई यांचे पुत्र आहेत. बसवराज बोम्मई हे येडियुरप्पा यांच्या जवळचे आणि लिंगायत समाजाचे आहे. मुख्यमंत्री म्हणून निवड केल्यानंतर बोम्मई म्हणाले, ही एक मोठी जबाबदारी आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याप्रमाणे गरीबांसाठी काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. मला मुख्यमंत्री पद मिळेल याचा विचार कधी केला नव्हता. परंतु मला माझ्या कष्टावर पूर्ण विश्वास होता आणि आज त्याचे फळ मला मिळाले.