Top Newsराजकारण

मराठा आरक्षणासाठी खा. संभाजीराजेंचा एल्गार; १६ जूनला पहिला मोर्चा

आतापर्यंत माझा संयम पहिला, मात्र आता मेलो तरी चालेल...; किल्ले रायगडावरून संभाजीराजे कडाडले

किल्ले रायगड : छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चांगलेच संतापलेले आज पाहायला मिळाले. तुम्ही माझा संयम पाहिला, पण आता काय होईल ते होईल. मी मेलो तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही असे स्पष्ट करतानाच संभाजीराजे यांनी मराठा समाजासाठी एल्गार पुकारला. अखेर किल्ले रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची त्यांनी घोषणा केली. येत्या १६ जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

३४८ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने रायगडावर भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी संभाजीराजेंनी आंदोलनाची घोषणा केली. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांना इशारेही दिले. छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं. त्या शाहू महाराजांच्या कोल्हापूरमधील समाधी स्थळावरूनच आम्ही आंदोलनाची सुरुवात करणार आहोत. १६ जून रोजी हा मोर्चा काढण्यात येईल, अशी घोषणा करतानाच आधीचं आणि आजचं सरकार मराठा आरक्षणावर एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. तुम्ही खेळ सुरू केला आहे का? खेळ करू नका. मी संयमी आहे. त्याचा मला अभिमान आहे. तुम्ही माझा संयम पाहिला. आता संयमी राहणार नाही. आता काय होईल ते होईल. मी मेलो तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संभाजीराजेंनी दिला.

लोकं नाराज झाले तरी चालतील. पण मी समाजाला वेठीस धरणार नाही. दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही. शिवभक्तांचा मला पाठिंबा आहे. तर काही शिवभक्त माझ्यावर नाराज आहेत. पण कोरोनाचं संकट असल्याने काहीच करता येत नाही. माझं काही चुकलं असेल तर मी दिलगिर आहे. आपण जगलो तर महाराजांचे विचार पुढे घेऊन जाऊ, असं संभाजीराजे म्हणाले.

मी राजकारणी नाही. राजकारण करत नाही. समाजावर अन्याय होत असेल तर न्याय देणं ही आमची भूमिका आहे. मराठा समाज वाईट परिस्थितीत आहे. त्यांच्यासाठी आवाज उठवायचा नाही का? सर्वांना आरक्षण आहे, मराठ्यांना नाही. मग मी आवाज उठवायचा नाही का? मराठा समाजावर अन्याय होत असेल तर सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी भोसले समिती स्थापन करण्यात आली. या समितीने अहवाल दिला आहे. काही शिफारशी केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन मी ज्या गोष्टी सांगितल्या त्याच भोसले समितीने सांगितल्या आहेत. समितीने काही वेगळं सांगितलं नाही. मी सांगितलेल्या पाच मागण्यांवर तत्काळ कार्यवाही करा, समाजाला वेठीस धरू नका, असं आवाहन त्यांनी केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button