
मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल २०२२) पुढील पर्वासाठी ८ फ्रँचायझींनी त्यांच्या रिटेन ( कायम राखलेल्या) खेळाडूंची यादी जाहीर केली. लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, डेव्हिड वॉर्नर, जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, राशिद खान, कागिसो रबाडा, जॉनी बेअरस्टो ही काही मोठी नावं रिटेन केलेल्या खेळाडूंच्या यादीतून गायब झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे आयपीएल २०२२ साठी होणाऱ्या लिलावात यापैकी कुणीतरी मोठी रक्कम पटकावेल यात शंका नाही.
पंजाब किंग्सनं कर्णधार लोकेश राहुलला रिटेन केलेलं नाही. त्यानं आयपीएलमध्ये ९४ सामन्यांत ३२७३ धावा केल्या आहेत आणि त्यात दोन शतकं व २७ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यांनी ताफ्यात दोनच खेळाडूंना कायम राखण्याचा निर्णय घेतल्यानं रवी बिश्नोई, शाहरुख खान, निकोलस पूरन यांचा पत्ता कट झाला आहे. शाहरुखनं नुकत्याच पार पडलेल्या मुश्ताक अली ट्रॉफीत तामीळनाडूला रोमहर्षक विजय मिळवून दिला होता.
आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या शिखर धवनला दिल्ली कॅपिटल्सनं रिलिज केलं. त्याच्या नावावर ५७८४ धावा आहेत.
दुखापतीतून कमबॅक करणाऱ्या श्रेयस अय्यरनं नुकतंच दणक्यात टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण केलं. त्यालाही दिल्ली कॅपिटल्सनं वगळलं. त्यानं ८७ सामन्यांत १६ अर्धशतकांसह २३७५ धावा आहेत.
ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू डेव्हिड वॉर्नर हा लिलावात अधिक भाव खाऊन जाईल. सनरायझर्स हैदराबादनं त्याला रिलिज केलं. त्यानं १५० सामन्यांत ५४४९ धावा केल्या आहेत. त्यात ४ शतकं व ५० अर्धशतकं आहेत.
सनरायझर्स हैदराबादनं फिरकीपटू राशिद खानला रिलिज करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय.
दिल्ली कॅपिटल्सनं अनुभवी गोलंदाज आर अश्विन यालाही वगळलं. त्यानं आयपीएल २०२१ त १३ सामन्यांत ७ विकेट्स घेतल्या होत्या.
मुंबई इंडियन्सनं हार्दिक व कृणाल या पांड्या बंधूना बाहेर पाठवले आहे.
या खेळाडूंव्यतिरिक्त जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स, दीपक हुडा, शार्दूल ठाकूर, कागिसो रबाडा, इशान किशन, भुवनेश्वर कुमार, जॉनी बेअरस्टो, दिनेश कार्तिक, सुरेश रैना, मोहम्मद शमी आदी तगडे खेळाडू लिलावासाठी उपलब्ध झाले आहेत.
रवींद्र जडेजा, रोहित शर्मा, रिषभ पंत ठरले सर्वात महागडे खेळाडू
आयपीएलच्या पुढील पर्वासाठी ८ फ्रँचायझींनी त्यांच्या रिटेन ( कायम राखलेल्या) खेळाडूंची यादी जाहीर केली. पंजाब किंग्सनं फक्त दोनच खेळाडूंना कायम राखले, तर सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांनी प्रत्येकी तीन आणि चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स, मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी प्रत्येकी चार खेळाडूंना कायम राखले आहे. आज एकूण २७ खेळाडूंना कायम राखले गेले आणि त्यात रवींद्र जडेजा, रोहित शर्मा, रिषभ पंत हे प्रत्येकी १६ कोटींची किंमत घेऊन सर्वात महागडे खेळाडू ठरले.
चेन्नई सुपर किंग्स – रवींद्र जडेजा (१६ कोटी), महेंद्रसिंग धोनी (१२ कोटी), ऋतुराज गायकवाड (६ कोटी), मोईन अली (८ कोटी)
राजस्थान रॉयल्स – सजू सॅमसन (१४कोटी), जोस बटलर (१०कोटी), यशस्वी जैस्वाल (४ कोटी)
कोलकाता नाइट रायडर्स – आंद्रे रसेल (१२ कोटी), वरुण चक्रवर्थी (८ कोटी), वेंकटेश अय्यर (८ कोटी) , सुनील नरीन (६ कोटी)
दिल्ली कॅपिटल्स – रिषभ पंत (१६ कोटी), अक्षर पटेल (१२ कोटी), पृथ्वी शॉ (८ कोटी), अॅनरीच नॉर्ट्जे (६ कोटी)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – विराट कोहली (१५ कोटी), ग्लेन मॅक्सवेल (११ कोटी), मोहम्मद सिराज (७ कोटी)
पंजाब किंग्स – मयांक अग्रवाल (१४ कोटी), अर्षदीप सिंग (४ कोटी)
सनरायझर्स हैदराबाद – केन विलियम्सन (१४ कोटी), अब्दुल समद (४ कोटी), उम्रान मलिक (४ कोटी)
मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (१६ कोटी), जसप्रीत बुमराह (१४ कोटी), किरॉन पोलार्ड (६ कोटी), सूर्यकुमार यादव (८ कोटी)
कशी दिली जाणार रिटेन (कायम ठेवलेल्या) खेळाडूंना रक्कम?
चार खेळाडू रिटेन केल्यास पहिल्या खेळाडूसाठी १६ कोटी, दुसऱ्यासाठी १२, तिसऱ्यासाठी ८ आणि चौथ्यासाठी ६ कोटी मर्यादा घातली गेली आहे. तीन खेळाडू रिटेन केल्यास पहिल्या खेळाडूसाठी १५ कोटी, दुसऱ्या खेळाडूसाठी ११ व तिसऱ्या खेळाडूसाठी ७ कोटी अशी मर्यादा असेल. दोन खेळाडू रिटेन केल्यास १४ व १० अशी अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या खेळाडूसाठी मर्यादा असेल. एकच खेळाडू रिटेन केल्यास तो १४ कोटींच्या आतच करावा लागेल.
कोणाला केलं रिलिज?
युझवेंद्र चहल. देवदत्त पडिक्कल, अक्षदीप नाथ, रजत पाटीदार, सुयश एस प्रभुदेसाई, सचिन बेबी, केएस भारत, फिन अॅलन, वॉशिंगटन सुंदर, शाहबाज नदीम, पवन देशपांडे, डॅनियल सॅम्स, जॉर्ज गार्टन, डेन ख्रिस्टीयन, हर्षल पटेल, स्कॉट कुगलेइजन, टिम डेविड, नवदीप सैनी, वानिंदु हसरंगा, कायले जेमिन्सन, केन रिचर्डसन, दुशमंथा चमीरा.




