
मुंबई : काही शिवसेना नेत्यांची मंत्रीपदाची संधी न मिळाल्याने किंवा ती हुकल्याने नाराजीचा सूर आहे. हे आता हळूहळू समोर येतंय. शिवसेनेचे नेते दीपक सावंत मागील सरकारमध्ये आरोग्यमंत्री होते. पण महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेनंतर दीपक सावंत यांना मंत्रिपदाची आणि आमदारकीची देखील संधी मिळाली नाही. त्यामुळे दीपक सावंत यांनी आज भर कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर खदखद व्यक्त केली.
दीपक सावंत यांनी लिहिलेल्या ‘वाईल्ड लाईफ फोटोबायोग्राफी’ आणि ‘उद्धव ठाकरे- द टायगर’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते त्यांच्या या दोन्ही पुस्तकांचे प्रकाशन झाले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. या कार्यक्रमात भाषण करताना दीपक सावंत यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपली नाराजी व्यक्त केली.
कोरोना काळात तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करायची इच्छा आहे. तुम्ही जी भूमिका द्याल ती मी करीन. साहेब फक्त साहित्यिक म्हणून ठेवू नका. तुमचे आशीर्वाद हवेत, अशा भावना दीपक सावंत यांनी व्यक्त केल्या. यादरम्यान दीपक सावंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमवेत केलेल्या जंगल भ्रमंतीचा आणि त्यांच्यासमवेत केलेल्या छायाचित्रण कलेचा अनुभव सांगितला. वन, जंगल वाचवण्यासाठीचा उद्धव ठाकरे यांचा आग्रह आणि काम यानिमित्ताने जवळून पहाता आले. माझ्यासह शिवसेना नेते सुरेश प्रभु, सुभाष देसाई, संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत जंगलभ्रमंती केली आहे. त्यावेळी त्यांच्यातील माणूस आम्हा सर्वांनाच जवळून पहावयास मिळाला. ते माझे या क्षेत्रातील गुरु आहेत. फोटोग्राफी करतांना ते अतिशय बारीक गोष्टींची काळजी घेतात हे जाणवले. पर्यावरणीय बदलाचे परिणाम थोपवण्यासाठी जंगले, वने वाचली पाहिजेत, असं दीपक सावंत यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्र्यांकडून सावंत यांचे कौतुक
मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमात दीपक सावंत यांचं कौतुक केलं. आजवर अनेक प्रकाशने झाली, पण आजचा प्रकाशन कार्यक्रम वेगळा आहे, डॉ. दीपक सावंत यांना छायाचित्रकार, लेखक म्हणून एक वेगळी ओळख देणारा हा कार्यक्रम आहे असे सांगत मुख्यमंत्र्यांनी डॉ. दीपक सावंत यांच्यासमवेत केलेल्या अनेक जंगल भ्रमंतीचा आपला अनुभव यावेळी सांगितला. ज्या कान्हा जंगलापासून वाईल्ड फोटोग्राफीला आपण सुरुवात केली तिथे फिरत असतांना वनरक्षकांच्या असलेल्या अडीअडचणी जाणवल्या, त्यातून आरोग्य शिबीराचे आयोजन, रुग्णवाहिकेची उपलब्धता, औषधांची उपलब्धता अशा अनेक बाबींच्या पूर्ततेत डॉ. सावंत यांनी केलेले कामही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वनरक्षकांच्या अनेक अडचणी असतात, त्यांच्या आरोग्याचे, कुटुंबाचे आणि मुलांचे शिक्षणाचे प्रश्न खुप वेगळे असतात हे या जंगल भ्रमंती दरम्यानच कळाल्याचे ते म्हणाले. वन्यजीवांना आपण त्रास दिला नाही तर ते आपल्याला त्रास देत नाहीत, इथे वावरण्याची एक शिस्त असते असे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, डॉ. सावंत यांनी कमॅऱ्यानेच नाही तर लेखणीने जंगल टिपले असल्याचे या दोन पुस्तकांवरून दिसून येते.




