शिक्षण

बारावीचा निकाल याच महिन्यात, मूल्यमापन प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाचा तिढा अखेर सुटला असून, मंडळाकडून निकालाच्या मूल्यमापनासाठी ३०:३०:४० चे सूत्र जाहीर झाले आहे. हे सूत्र सीबीएसई मंडळाच्या धोरणावरच अवलंबून आहे. यात दहावीच्या परीक्षेतील सर्वाधिक गुण मिळालेल्या तीन विषयांच्या सरासरी गुणांचे ३० टक्के, अकरावीच्या अंतिम निकालातील विषयनिहाय गुणांचे ३० टक्के आणि बारावीच्या वर्षभरातील सत्र परीक्षा, सर्व चाचण्या आणि तत्सम परीक्षांच्या विषयनिहाय गुणांच्या ४० टक्क्यांच्या गुणांचा अंतर्भाव असेल. आता, या मुल्यमापन निकालाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

कनिष्ठ महाविद्यालयांनी निकालाची कार्यवाही कशी आणि कधीपर्यंत करावी, याचे सविस्तर वेळापत्रक मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार, अंतर्गत मूल्यमापनाचे काम शिक्षकांना ७ जुलैपासून सुरु करायचे असून २३ जुलैपर्यंत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापनाचे काम पूर्ण करायचे आहे. तसेच, निकाल तयार करून मंडळाकडे पाठवायचे आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी इ. १२ वीचे मुल्यमापन प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

मुख्याध्यापक, प्राचार्यांनी निकाल समितीने प्रमाणित केलेल्या निकालानुसार विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये भरण्यासाठी १४ ते २१ जुलै दरम्यान वेळ देण्यात आला आहे. त्यासोबतच समितीने प्रमाणित केलेले विद्यार्थ्यांचे निकाल सीलबंद पाकिटात विभागीय मंडळात २१ ते २३ जुलै या कालावधीत जमा करायचे आहेत. त्यानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावी परीक्षेचा निकाल विभागीय मंडळ व राज्य मंडळ स्तरावर पुढील प्रक्रिया केली जाणार असून ३१ जुलैपर्यंत बारावी बोर्डाचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button