
मुंबई : भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. शेलार यांच्याविरोधात मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर आज त्यांनी आपला जबाब नोंदवला. यावेळी भाजप नेतेही उपस्थित होते. कागदी वाघांना आम्ही घाबरणार नसल्याचे म्हणत ही राजकीय सूडबुद्धीने गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. दरम्यान, दरम्यान, एका आक्षेपार्ह वक्तव्यावरुन महापौर किशोरी पेडणेकर यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आज आशिष शेलार यांनी जामीनासाठी अर्ज केला. त्यानंतर शेलार यांना १ लाखाचा ऑनटेबल जामीन मंजूर केला आहे. इतकंच नाही तर शेलार यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत महापौरांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी केली आहे.
आज सकाळपासून आशिष शेलार यांच्या घराबाहेर समर्थक, कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपातील नेते अतुल भातखळकर, मंगल प्रभात लोढा आदी शेलार यांच्यासह उपस्थित होते. शेलार यांनी जबाब नोंदवल्यानंतर भाजप नेत्यांनी राज्य सरकार आणि शिवसेनेवर टीका केली.
I moved Hon.High Court via Writ Petition No.19100 to quash the false criminal case foisted against me by this vindictive Thackeray Sarkar which is seeking to silence my voice exposing corruption & injustice being done to Mumbaikars!
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 9, 2021
भाजप नेते अतुल भातखळकर यांनी म्हटले की, भाजप अशा लोकांना घाबरणार नाही. राज्य सरकार एवढे संवेदनशील आहे तर मग पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल का नाही? महबूब शेख प्रकरणात बलात्काराचा आरोप झाला आजपर्यंत कारवाई का झाली नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. भातखळकर यांनी यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. मी केलेल्या एका ट्वीटवरून संजय राऊत बिथरले असून त्यांनी भाजप आणि पक्षातील महिलांचा अपमान केला असल्याचे भातखळकर यांनी म्हटले. संजय राऊत यांनी जी असभ्य भाषा वापरली त्यामुळे कोणाच्या डोक्यात कचरा आहे हे स्पष्ट झाले असल्याचे ही त्यांनी म्हटले. वरळी सिलेंडर स्फोटात झालेल्या मृत्यूंवरील लक्ष हटवण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचा आरोप भाजप नेते आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केला.
फडणवीसांकडून शेलारांचं समर्थन
भाजपाचा कुठलाही नेता कोणत्याही महिलेबद्दल अपशब्द वापरूच शकत नाही. महापौरांबद्दल आम्हाला पूर्ण आदर आहे.
आशीष शेलार @ShelarAshish शिवसेनेविरुद्ध आक्रमक बोलतात, त्यामुळे त्यांना शांत करण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला का, हा प्रश्न आहेच.
नागपूर येथे माध्यमांशी संवाद… pic.twitter.com/60F9oN6wpA— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 9, 2021
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेलारांची पाठराखण केलीय. आशिष शेलार महिलांचा अवमान करूच शकत नाहीत. महापौरांविषयी तर अजिबातच नाही. त्यांच्या प्रेसनोटचा, वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला. महापौरांबद्दल आम्हाला अतिशय आदर आहे, असं ते म्हणालेत. ते शिवसेनेच्या विरोधात सातत्यानं बोलतात, म्हणूनच त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय.
शेलार यांचा इशारा
जी केस बनूच शकत नाही ती केस बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आम्ही कायदा सुव्यवस्था मानणारे आहोत, न्यायिक व्यवस्थेला मानणारे आहोत. त्यामुळे खोटा का होईना गुन्हा त्यांनी काल दाखल केला त्याबद्दल मी जामीन घेतला. त्याबरोबरीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये हा एफआयआर क्वॅश केला पाहिजे, यासाठी मि क्वॅशिंग पिटिशनही दाखल केलं आहे. त्याची कॉपीही पोलिस ठाण्यात दिली आहे. न्यायिक व्यवस्थेतून सत्य मी बाहेर आणेन, पण यांना पुन्हा सांगू इच्छितो की, आम्ही सगळे सहकारी शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणाविरोधात संघर्ष अजून कडवा करु. तुम्ही जेवढा आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कराल, भारतीय जनता पार्टी तो आवाज अजून उचलेल आणि तुमची कू कृत्य जनतेसमोर उघड करु’, असा इशारा शेलार यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला दिलाय.
शेलारांचं वक्तव्य अवमानकारक : चाकणकर
भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौरांबाबत केलेलं वक्तव्य अवमानकारक असल्याची प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिलीय. मुंबईच्या मरीन लाइन्स पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईच्या पोलीस आयुक्तांना या संदर्भातला सत्यस्थिती अहवाल मागितला आहे. त्यानुसार गरज भासल्यास आरोपीला अटक करण्यात यावी, असे निर्देश दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.




