हिमंत बिस्वा सरमा आसामचे नवे मुख्यमंत्री; सोमवारी शपथविधी
गुवाहाटी : ज्येष्ठ भाजप नेते हिमंत बिस्वा सरमा यांची आसाम भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. ते सोमवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेता नरेंद्र सिंह तोमर यांनी ही माहिती दिली . यापूर्वी विद्यमान मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी राज्यपाल जगदीश मुखी यांच्याकडे राजीनामा सादर केला.
भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक रविवारी झाली. या बैठकीत मावळते मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सरमा यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला. त्याला भाजपा प्रदेशाध्यक्ष रंजीत कुमार दास आणि आमदार नंदीता गार्लोस यांनी अनुमोदन दिलं. या बैठकीत एकमतानं सरमा यांची निवड करण्यात आली, अशी माहिती तोमर यांनी दिली आहे.
१२६ सदस्यांच्या आसाम विधानसभेत भाजपानं ६० जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपाचे मित्रपक्ष असलेल्या असम गण परिषद यांनी ९ तर युनायटेड पिपल्स पार्टी लिबरल या पक्षानं ६ जागा जिंकल्या आहेत. भाजपाने निवडणुकीच्यापूर्वी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. या पदासाठी सोनोवाल आणि सरमा यांच्यात चुरस होती. निवडणुकीच्या निकालानंतर या दोन्ही नेत्यांना दिल्लीमध्ये बोलवण्यात आले होते. या दोघांनी शनिवारी भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची एकापाठोपाठ एक स्वतंत्र भेट घेतली होती.