मुंबई : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्यासह मराठा समन्वयकांशी चर्चा केली व छत्रपती संभाजीराजेंना उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र, संभाजीराजेंनी समाजाच्या मागण्यांबाबत सरकारकडून लेखी निर्णय व भरीव अंमबजावणी सुरू होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे संभाजीराजेंनी म्हटले. त्यानंतर, माध्यमांशी बोलताना वळसे पाटील यांन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात चर्चा करणार असल्याचं सांगितलं.
छत्रपती संभाजीराजे आझाद मैदानातील मांडवात गादी टाकून झोपल्याचे फोटो, मोबाईल हातात घेऊन पाहतानाचे फोटो व्हायरल झाले आहेत. यासह, माझा राजा उपाशी… अशा कॅप्शनने हे फोटो शेअर होत आहेत. ज्यांच्या पूर्वजांनी आरक्षण दिलं, त्या गादीचे वारसदार आज आरक्षणासाठी आझाद मैदानावर बसल्याने अनेकांनी सरकारविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यामुळेच, आज सरकारमधील गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी संभाजीराजेंची भेट घेतली.
मराठा आरक्षणासंबंधी राज्य सरकार सकारात्मक असून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. मराठा समाजातील युवक व विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, यासाठी विविध शासकीय योजनांमधून राज्य सरकार मदत देऊ करत आहे.
— HMO Maharashtra (@maharashtra_hmo) February 27, 2022
त्याचबरोबर मराठा आरक्षणासंबंधी राज्य सरकार सकारात्मक असून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहे. मराठा समाजातील युवक व विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, यासाठी विविध शासकीय योजनांमधून राज्य सरकार मदत देऊ करत आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी मांडलेले प्रश्न लवकर सुटलेच पाहिजेत. मात्र छत्रपती संभाजीराजे यांची प्रकृती देखील आमच्यादृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळे हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावेत यासाठी राज्य सरकारशी चर्चा करून प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया गृहमंत्र्यांनी याप्रसंगी दिली.
मराठा समाजाच्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी छत्रपती संभाजीराजे आमरण उपोषणास बसले आहेत. आज दि. २७ फेब्रुवारी रोजी सायं. ६ वा. राज्य सरकारच्या वतीने गृहमंत्री दिलीप पाटील हे आझाद मैदान येथे उपोषणस्थळी आले.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) February 27, 2022
मराठा समाजाच्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी छत्रपती संभाजीराजे आमरण उपोषणास बसले आहेत. आज दि. २७ फेब्रुवारी रोजी सायं. ६ वा. राज्य सरकारच्या वतीने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे आझाद मैदान येथे उपोषणस्थळी आले. वळसे पाटील यांनी छत्रपती संभाजीराजे यांचेसह मराठा समन्वयकांशी चर्चा केली व छत्रपती संभाजीराजेंना उपोषण सोडण्याची विनंती केली. मात्र छत्रपती संभाजीराजेंनी समाजाच्या मागण्यांबाबत सरकारकडून लेखी निर्णय व भरीव अंमबजावणी सुरू होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याची घोषणा केली, असं ट्विट संभाजीराजे यांनी केलंय.
भाजपचा आंदोलनास पाठिंबा
संभाजीराजेंच्या आंदोलनास भाजपनेही पाठिंबा दिला आहे. संभाजीराजेंच्या निर्णयाचे आपण स्वागत करतो. मराठा समाजासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या परंपरेतील मान्यवरांनी केलेल्या आंदोलनात भाजप पूर्ण पाठिंबा देईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात सांगितले. मराठा समाजासाठी भाजपच्या झेंड्याखाली आंदोलन सुरू केले तर त्याला राजकीय वळण येईल. त्यामुळे भाजप असे आंदोलन करणाऱ्या मान्यवरांना पूर्ण पाठिंबा देईल, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.