कल्याण-डोंबिवलीत विक्रमी ३८७.८ मिमी पावसाची नोंद
कल्याण : गेल्या २ दिवसांपासून कल्याणडोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून आज दुपारी ३ वाजेपर्यंत कल्याण डोंबिवली परिसरात विक्रमी ३८७.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सततच्या होणा-या अतिवृष्टीमुळे महापालिका क्षेत्रातील काही सखल भागात पावसाचे पाणी शिरुन पाणी साचले होते.
अ प्रभागातील बल्याणी रोड खचल्यामुळे काल रात्री बल्याणी मधील काही घरात पाणी शिरले होते. सदर परिसरात ९०० मीटरचे ६ नवीन पाईप बसविल्यामुळे पाण्याचा निचरा करण्यात आला. तेथील परिसरात सकाळी सुमारे १००० फुड पॅकेटचे वितरण करण्यात आल्याचे केडीएमसीकडून सांगण्यात आले आहे. महापालिकेच्या जे प्रभागतही वालधुनी नदीच्या पुराचे पाणी परिसरात गेल्यामुळे तेथील लोकांना जवळच्या शाळेत स्थलांतरीत होणेबाबत विनंती केडीएमसीकडून करण्यात आली आहे. ओम टॉवर, वालधुनी येथील पावसाचे साचलेले पाणी जेसीबीच्या मदतीने काढून पाण्याचा निचरा करण्यात आला.
ई प्रभागात कोळे गावात सखल भागात अतिवृष्टीमुळे पाणी साचल्याने कुटूंबाची नजीकच्या शाळेत व्यवस्था करण्यात आली . या ठिकाणी देखील आज दुपारी १०० फुड पॅकेटचे वाटप करण्यात आले. महापालिकेच्या ह प्रभागतही कोपर नाल्याजवळील अण्णा नगर वसाहती पाणी शिरल्यामुळे तेथील नागरिकांना जनगणमन शाळेत स्थलांतरीत करण्यात आले . तेथे आज 50 फुड पॅकेटचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे जुनी डोंबिवली येथे कोपर रेल्वे ब्रिज जवळ पाणी शिरल्यामुळे सदर वसाहतीतील ५० कुटूंबांना जवळील इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे.
आय प्रभागातही वसार गावातील चाळीत पाणी शिरल्यामुळे पाण्याचा निचरा करण्यासाचे काम सुरूआहे. ग प्रभागतही टंडन रोड येथे जमा झालेले पावसाचे पाणी जेसीबीने कच्चे गटार काढून सदर पाण्याचा निचरा करण्यात आला. महापालिकेची अग्निशमन यंत्रणेकडे ६ मशिनसह रबर बोट, १०० लाईफ बॉय, २५० लाईफ जॅकेट, १००० -२००० मी. पर्यंत दोरखंड, पट्टीचे पोहणारे ५० जलतरण पटू सह आपत्कालिन परिस्थितीशी सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.