Top Newsफोकस

अफगाणिस्तानातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर; विमानात बसताना शेकडो लोकांची चेंगरा-चेंगरी

काबूल : अमेरिकी सैन्याने अफगाणिस्तान सोडल्यानंतर काही काळातचं तालिबानने सक्रीय होत अफगाणिस्तानातील बहुसंख्य शहरांचा ताबा घेतला. रविवारी अफगाणिस्तानात मोठ्या घडामोडी घडल्या. तालिबाननं अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये प्रवेश करुन राष्ट्रपती भवन आपल्या ताब्यात घेतलं. यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांच्यासह अनेक मोठे नेते देश सोडून गेले आहेत. त्याच वेळी, अफगाणिस्तानातील हजारो सामान्य नागरिकही काबूल सोडून इतर देशांमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, अफगाणिस्तानातील एक व्हीडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. अनेक नागरिक तालिबानच्या जुलमी राजवटीत राहण्यापेक्षा देश सोडण्याचा विचार करत आहेत. काबूलमधून बाहेर जाणाऱ्या विमानांमध्ये बसण्यासाठी नागरिकांची झुंबंड उडाली आहे. व्हीडिओत शेकडोच्या संख्येने लोक एकाच विमानात चढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. यादरम्यान विमानात चढण्याच्या पायऱ्यांवर चेंगरा-चेंगरी झालेली पाहायला मिळत आहे. कसंही करुन या सर्वांना देश सोडून पळायचंय. हा व्हीडिओ काबूल विमानतळावरील आहे. व्हीडिओत विमानाला हजारो लोकांनी घेरलेलं दिसत आहे. तालिबानच्या प्रवक्त्यांनी देशातील नागरिकांना देश सोडू नये. त्यांच्या जीवाला, संपत्तीला हानी पोहोचवली जाणार नाही असं आवाहन केलंय. पण, तालिबानच्या जुन्या राजवटीचा अनुभव असल्यानं हजारो नागरिकांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अफगाणिस्तानातील हे दृष्य पाहून तेथील नागरिकांच्या मनातील भीतीचा फक्त अंदाजच आपल्याला लावता येऊ शकतो.

काबुल विमानतळावर गोळीबारानंतर प्रचंड गोंधळ

तालिबानच्या ताब्यात गेलेल्या अफगाणिस्तानमधील परिस्थिती दिवसागणिक बिघडत आहे. लाखो लोक देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात आहे. यातल्या काहींनी पाकिस्तानात आश्रय घेतला. काही जणांनी काबूल विमानतळावर धाव घेतली आहे. देश सोडून जाण्यासाठी अनेकांसमोर काबुल हाच एकमेव पर्याय उरला असताना आज तिथेही गोळीबार झाला आणि परिस्थिती बिघडली. गोळीबार होताच विमानतळावर एकच गोंधळ झाला. लोक सैरावैरा पळू लागले. त्यात अनेक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. सध्या अमेरिकेनं काबूल विमानतळ ताब्यात घेतले आहे. अमेरिका ६ हजार सैनिक काबुलमध्ये उतरवण्याच्या तयारीत आहे.

अफगाणिस्तानमधील परिस्थिती बिघडत असताना आज संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची बैठक होत आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या बैठकीकडे जगाचं लक्ष लागलं आहे. राजधानी काबूलमधील विमानतळावर सध्या गोंधळाची परिस्थिती आहे. जीव वाचवण्यासाठी लोकांची धावपळ सुरू आहे. त्यात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले आहेत. काबुल विमानतळावरील परिस्थिती दाखवणारे काही व्हिडीओ समोर आले आहेत. त्यातून परिस्थितीचं गांभीर्य आणि भीषणता दिसून येत आहे.

भारतीयांची सुटका करण्यासाठी सरकारचे प्रयत्न

भारतानं आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. एअर इंडियानं दोन विमानं स्टँडबायवर ठेवली आहेत. केंद्राचे आदेश मिळताच ही विमानं दिल्लीहून उड्डाण करतील आणि काबुलमध्ये उतरतील. सध्या काबुलचा विमानतळ अमेरिकेच्या ताब्यात आहे. अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी दोन विमानं सज्ज ठेवण्याच्या सूचना मोदी सरकारकडून एअर इंडियाला देण्यात आल्या आहेत. काबुलच्या दिशेनं झेपावण्यास सज्ज असलेल्या विमानातील कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. अफगाणिस्तानात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे काबुलमधील हमीद करझाई आंततराष्ट्रीय विमानतळावरून होत असलेली हवाई वाहतूक प्रभावित झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button