आरोग्यशिक्षण

आरोग्य विभागाची भरती परीक्षा आता २४ ऑक्टोबरला; २ हजार ७३९ रिक्त पदे भरणार

नाशिकः चक्क दोन वेळा रद्द झालेल्या आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेची तारीख अखेर ठरली असून, ती २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागातील आयुक्तालय आरोग्य सेवा अंतर्गत गट ‘क’ व ‘ड’ पदभरती परीक्षेबाबत २८६९ उमेदवारांच्या तक्रारी आल्या आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत या वस्तुस्थिती मांडून शंकांचे निरसन केले. त्या म्हणाल्या की, आरोग्य विभागाची भरती परीक्षा येत्या २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. राज्य स्तरावरील २४ आणि मंडळ स्तरावरील २८ आशा एकूण ५२ संवर्गासाठी ही परीक्षा होणार असून, त्यातून २ हजार ७३९739 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या परीक्षेसाठी एकूण ४ लाख ५ हजार १५६ अर्ज झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आरोग्य विभागात १००100 टक्के रिक्त पदे भरण्याची परवानगी दिली असून, न्यास एजन्सीमार्फत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीची सविस्तर उत्तरे देत शंका-निरसन करण्याचाही प्रयत्न केला.

अनेक उमेदवारांनी मागितलेल्या परीक्षा केंद्रापेक्षा वेगळे व दूरचे केंद्र देण्यात आल्याचे म्हटले आहे. यावर डॉ. पाटील म्हणाल्या की, उमेदवारास परीक्षा केंद्र देताना प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार करण्यात आला असून, उमेदवाराचे पद ज्या नेमणूक अधिकाऱ्याच्या अंतर्गत येते त्या विभागात त्यास परीक्षा केंद्र दिले आहे. उदा. उमेदवाराने अकोला विभागातील पदासाठी अर्ज केला असल्यास त्यास अकोला विभागातीलच परीक्षा केंद्र मिळेल. म्हणजेच उमेदवार ज्या विभागात नोकरी करू इच्छितो त्या विभागात त्याने परीक्षा देणे अपेक्षित आहे. ही अट ठेवली नाही तर कोणत्याही भागातील उमेदवार आपल्या गावी बसून राज्यातील इतर कोणत्याही भागासाठी अर्ज करतील आणि निवड झाल्यावर एक तर हजर होणार नाहीत किंवा हजर होऊन काम करणार नाहीत किंवा पहिल्या दिवसापासून बदली मागतील. याचा सर्वात जास्त दुष्परिणाम आदिवासी भागावर होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

अनेक उमेदवारांनी वेगवेगळ्या परीक्षांसाठी अर्ज केला आहे व फीस सुद्धा दिली आहे. मात्र, या सर्व पदांच्या परीक्षा एकाच वेळी होत आहेत त्यामुळे उमेदवारास इतर ठिकाणी परीक्षा देता येणार नाही, अशी तक्रार केली आहे. याबाबत डॉ. पाटील म्हणाल्या की, २४ ऑक्टोबर रोजी होणारी परीक्षा १४ नेमणूक अधिकाऱ्यांच्या / कार्यालयांच्या अधिनस्त ५२ संवर्गासाठी घेण्यात येत आहे. उमेदवारांनी एकाच पदासाठी वेगवेगळ्या नेमणूक अधिकाऱ्यांकडे/ कार्यालांकडे अर्ज केले आहेत. उदा. एका उमेदवाराने वाहन चालक पदासाठी उपसंचालक पुणे, नाशिक, अकोला येथे आणि सहसंचालक पुणे येथे अर्ज केले आहेत. या उमेदवारास सर्व परीक्षा देण्याची सोय करावयाची झाल्यास वाहन चालकाच्या प्रत्येक मंडळ व सहसंचालक कार्यालयाच्या परीक्षा वेगवेगळ्या १४ रविवारी घ्याव्या लागतील. हीच बाब ५२ संवर्ग आणि १४ नेमणूक अधिकारी / कार्यालांचे बाबत ठरवावयाची झाल्यास या परीक्षा दीड ते दोन वर्ष चालतील . त्यामुळे ५२ संवर्गांच्या परीक्षा २ शिफ्टमध्ये घेण्यात येत आहेत. तसा उल्लेखसुद्धा जाहिरातीमध्ये अर्ज भरण्याच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये तसेच वारंवार notification मध्ये केलेला आहे . उमेदवारांना सोयीचे व्हावे यासाठी यातील पहिल्या शिफ्टमध्ये १० ते १२ वी शिक्षण आवश्यक असणारे व दुसऱ्या शिफ्टमध्ये पदवी व त्यावरील शिक्षण आवश्यक असणारे संवर्ग सामाविष्ट केले असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button