मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. मला अस वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला जनतेने कधीच जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी आजही मुख्यमंत्री आहे हेच तुम्ही मला जाणवून दिलं आहे, असं फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीसांच्या या वक्तव्यावरुन काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी फडणवीसांना जोरदार टोला लगावलाय. फडणवीस दोन वर्षानंतरही मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नरंजनातच मग्न, असं लोंढे म्हणाले.
भारतीय जनता पक्ष सत्तेवरून पायउतार होऊन दोन वर्ष झाली तरी देवेंद्र फडणवीस यांना आजही तेच मुख्यमंत्री असल्याचा भास होत आहे. दोन वर्षापासून फडणवीस हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत हे वास्तव त्यांनी अजूनही स्विकारलेले नाही. पण स्वप्नरंजनातून बाहेर पडून फडणवीस यांनी वास्तव स्विकारले पाहिजे, असा खोचक सल्ला लोंढे यांनी फडणवीसांना दिलाय.
फडणवीस यांना सत्तेचा मोह सुटलेला दिसत नाही. सत्ता हातातून जात आहे असे दिसताच त्यांनी पहाटेचा प्रयोग करुन पाहिला, पण त्यांचे ते मुख्यमंत्रीपद हे औटघटकेचे ठरले. त्यानंतरही सतत ‘मी पुन्हा येईन’ ‘मी पुन्हा येईन’, असा घोषा लावत बसले पण पुन्हा काही संधी मिळाली नाही. मविआचे सरकार आज पडणार, उद्या पडणार, या तारखेला पडणार, चार दिवसानंतर पडणार अशा ज्योतिषाच्या तारखा सांगूनही झाल्या. पण राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार काही जात नाही, उलट ते आजही भक्कम आहे. पण फडणवीसांना मात्र शेखचिल्लीसारखे आजही स्वप्नरंजनातच मग्न होण्यात जास्त रस दिसतो, अशी टीका अतुल लोंढे यांनी केलीय.
भाजपमध्ये कोण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे, तर कोणाला आपलाच नंबर आहे असे वाटते. पण देवेंद्र फडणवीस स्वप्नातही मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडायला तयार नाहीत. यातून भाजपातील मुख्यमंत्रीपदाच्या इच्छुकांनी काय तो बोध घ्यावा. जनतेचा महाविकास आघाडीवर विश्वास आहे. जनता भाजपला कायम विरोधी पक्षातच पाहू इच्छिते, त्यामुळे त्यांनी मनाची तयारी करून वास्तव स्वीकारावे अशी कोपरखळीही लोंढे यांनी लगावली आहे.
ते मनातून काढून टाका : मलिक
दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मीडियाशी बोलताना फडणवीसांना टोला लगावला. दोन वर्ष फिरत असताना मला असं वाटत नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी मुख्यमंत्रीच आहे असं मला वाटतं असं देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. मला वाटतं दोन वर्ष होऊन गेली आहेत. पण ते मुख्यमंत्रीपदाच्या मानसिकतेतून बाहेर पडताना दिसत नाहीत. विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेत त्यांनी काम केलं पाहिजे. ते मुख्यमंत्री नाहीत हे त्यांनी मनातून काढलं पाहिजे. विरोधी पक्षनेतेपद सुद्धा मोठं आहे. ते पद मुख्यमंत्रीपदापेक्षा कमी नाही हे त्यांना कळलं पाहिजे, असा चिमटा मलिक यांनी काढला आहे.
देवेंद्र फडणवीसांची ‘मन की बात’
देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबईत होते. यावेळी एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी हे विधान करून पुन्हा एकदा राजकीय चर्चांना तोंड फोडले आहे. मला अस वाटतच नाही की मी मुख्यमंत्री नाही. मला जनतेने कधीच जाणवू दिलं नाही की मी मुख्यमंत्री नाही. मी आजही मुख्यमंत्री आहे हेच तुम्ही मला जाणवून दिलं आहे, असं फडणवीस म्हणाले. गेली दोन वर्ष एकही दिवस घरात न थांबता मी जनतेच्या सेवेमध्ये आहे. त्यामुळे मला जनतेनेही कधी मी मुख्यमंत्री नसल्याचं जाणवू दिलं नाही. विरोधी पक्षनेता म्हणून मी उत्तम करत आहे. ज्या दिवशी मला जनतेचा आशीर्वाद मिळेल त्या दिवशी इथे मी देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी येईल. त्यामुळे त्याची काळजी घेऊ नका. मी नक्की येईल. तुमचं निमंत्रण मी आजच स्वीकारतो, असंही ते म्हणाले.