
मुंबई : आर्यन खान अटक प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आरोपांची मालिका लावली आहे. त्यामुळे एनसीबीची पुरती कोंडी झाली आहे. आज सकाळी पुन्हा एकदा मलिक यांनी एनसीबीच्या एका अधिकाऱ्याच्या खोट्या प्रकरणाबद्दल पत्र लिहिले होते. आता हेच पत्र नवाब मलिक यांनी दिल्लीतील एनसीबीच्या महासंचालकांना पाठवले आहे.
एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने मलिक यांना निनावी पत्र लिहिले होते. या पत्रात समीर वानखेडे आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे खोटे प्रकरण केली, याचा खुलासा या पत्रात केला आहे. मलिक यांनी या निनावी पत्रासह एनसीबीच्या महासंचालकांकडे तक्रार केली आहे. मालिक यांच्या घरच्या पत्त्यावर एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने पत्र पाठवले होते. या पत्रात समीर वानखेडे आणि काही अधिकारी खोट्या केसेस टाकून लोकांना अडकवलं जात असल्याचा आरोप केला होता. मलिक यांनी हे पत्र एनसीबीच्या महासंचालकांना पाठवले असून त्यासोबत आपले तक्रार पत्रही पाठवले आहे. आज सकाळी नवाब मलिक यांनी एक ट्विट केले होते. हे ट्विट केल्यानंतर पुढील काही मिनिटांत नवाब मलिक यांनी आणखी एक ट्विट केलं.
As a responsible citizen I am sending a copy of the letter to the DG Narcotics requesting him to include it in the investigation being conducted on Sameer Wankhede.
The letter was sent to me by an unnamed NCB official. pic.twitter.com/08i4py0KT4— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 26, 2021
हे पत्र एनसीबीतील एका अधिकाऱ्याने पाठवले, नाव गुप्त आहे. हे पत्र त्यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना पाठवले आहे. २६ प्रकरणांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. २६ प्रकरणांत कशी फसवणूक झाली याची माहिती पत्रात आहे. या पत्रात असं आहे की लोकांना यामध्ये अडकवले जात आहे, खोट्या केस बनवल्या जात आहे असं उल्लेख आहे. एनसीबीने आता चौकशी बसवली आहे, या गोष्टींचा सुद्धा चौकशी करावी. या पत्राबाबत सुद्धा चौकशी करण्यात यावी. वसुली करण्यात आली आहे. एनसीबीमध्ये चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे, त्याची चौकशी करावी, अशी मागणी मलिक यांनी केली होती.
पोलीस आयुक्तांनी घेतली गृहमंत्र्यांची भेट
पंच प्रभाकर साईलला पोलीस संरक्षण दिल्यानंतर आता हालचालींना वेग आला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. यावेळी, गृहमंत्र्यांनी गुन्हा दाखल होण्याच्या प्रक्रियेबद्दल विचारणा केल्याची माहिती समोर आली आहे. प्रभाकर साईलने तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कुठपर्यंत आलीये अशी विचारणा खुद्द गृहमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे या प्रकरणी एनसीबीवर गुन्हा दाखल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
प्रभाकर साईल याने एनसीबीच्या एका बड्या अधिकाऱ्यावर आणि पंच केपी गोसावी यांच्यावर खंडणीचा आरोप केला आहे. प्रभाकर साईल हा स्वत:ला केपी गोसावीचा बॉडीगार्ड असल्याचं सांगत आहे. किरण गोसावीनं शाहरुख खानकडे २५ कोटींची मागणी केली होती. त्यानंतर ही डील १८ कोटींवर झाली. यातील ८ कोटी हे एनसीबीच्या अधिकाऱ्याला द्यायचे असं ठरलं होतं. त्याच्या आरोपानंतर त्याने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी त्याला संरक्षण दिले आहे. तर दुसरीकडे एनसीबी आणि समीर वानखेडे यांनी साईलचा दावा ग्राह्य धरू नये म्हणून कोर्टात धाव घेतली पण तिथेही याचिका फेटाळून लावली.




