राज्यातील १३ विद्यापिठांच्या परीक्षा ऑनलाईन : उदय सामंत
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आज रात्री ८ पासून १ मे च्या सकाळी ७ पर्यंत हा कडक लॉकडाऊन असणार आहे. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे १०वीची परीक्षा रद्द केल्या असून १२वीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच आता विद्यापिठाच्या सर्व परीक्षा देखील ऑनलाईन होणार आहेत. महाराष्ट्रातल्या १३ अकृषी विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन माध्यमातून होणार आहेत. याबाबत सर्व विद्यापिठांच्या कुलगुरूंसोबत बैठक झाली असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
काही ठिकाण ऑनलाईनचा पर्याय निवडला होता. पण कालच्या सगळ्या कोविड परिस्थितीमुळे आणि निर्बंधांमुळे विद्यार्थ्यांना घरातून बाहेर पडणे मुश्किल होणार आहे. म्हणून आम्ही सर्वानुमते असा निर्णय घेतला आहे की, महाराष्ट्राच्या १३ अकृषी विद्यापिठांमध्ये उर्वरित असलेल्या सर्व परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने घेता येतील. ऑनलाईन परीक्षा घेत असताना विद्यार्थ्यांना काही तांत्रिक अडचण निर्माण होत असेल त्याची पूर्तता करण्याच्या सूचना आणि विनंती १३ ही विद्यापिठांच्या कुलगुरुंना केली आहे. जेणेकरून कोणताही विद्यार्थी ऑनलाईन परीक्षापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता विद्यापिठाने, महाविद्यालयाने आणि संस्था चालकांनी घेतली पाहिजे. अशा पद्धतीची चर्चा निश्चित करण्यात आली आहे, असे उदय सामंत म्हणाले.
१३ अकृषी विद्यापिठांमध्ये कोरोनाच्या निमित्ताने परीक्षा थांबलेल्या नाहीत. परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. काल काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीमध्ये ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्या आहेत. परंतु उद्यापासून ऑफलाईन परीक्षा घेणे हे कुठच्याही विद्यापिठाला शक्य नसल्यामुळे सगळ्याच विद्यापिठांच्या कुलगुरूंनी शासनाकडे ही विनंती केली की, जर ऑनलाईनला प्राधान्य दिलं आणि जर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतल्या तर विद्यार्थ्यांना घरातून परीक्षा देणं शक्य होणार आहे. म्हणून तशा पद्धतीचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पण हा निर्णय घेत असताना कोणत्याही परिस्थितीत एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही किंवा कुठल्याही विद्यार्थी आणि विद्यार्थींनीच नुकसान होणार नाही याची दक्षता विद्यापिठाने घेतली पाहिजे. अशा वेळी विद्यापिठाने जी काही अवश्य यंत्रणा विद्यापिठाला लागेल. ती देखील पुरवण्याचा निर्णय आज आम्ही घेतला आहे,’ असे उदय सामंत म्हणाले.