राजकारणशिक्षण

राज्यातील बारावीच्या परीक्षेबाबत सखोल अभ्यास करून निर्णय : नवाब मलिक

मुंबई : पंतप्रधानांनी ‘सीबीएसई’च्याबाबतीत निर्णय घेतला आहे, परंतु राज्य सरकार बारावी परीक्षेच्या बाबतीत सखोल अभ्यास करून निर्णय घेईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

पंतप्रधानांनी सीबीएसई बारावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. घोषणा करणे आणि त्या घोषणेनंतर काय पर्याय उपलब्ध आहेत याचाही अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्यातील बारावीच्या मुलांना डॉक्टर, इंजिनिअर होताना त्यांचे भविष्य उज्ज्वल कसे होईल याचा सगळा अभ्यास केल्यानंतर राज्य सरकार निर्णय घेईल असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

…म्हणून भाजपची तारीख पे तारीख

राज्यात सत्ता येणार ही भाजपची भविष्यवाणी खरी ठरत नाही. त्यामुळे भाजप नेत्यांना नैराश्य आलं असून पक्षातील नेते, कार्यकर्त्यांनी पक्षांतर करू नये म्हणूनच ते तारीख पे तारीख देत आहेत, अशी खोचक टीकाही मलिक यांनी केली आहे.

मलिक यांनी माध्यमांशी बोलताना भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपचे लोक तारीख पे तारीख देत आहेत. सत्ता येणार…सत्ता येणार… ही भाजपची एकही भविष्यवाणी सत्य होत नाहीये. त्यामुळेच ते हताश होवून आघाडी सरकार विरोधात एककलमी कार्यक्रम राबवत असल्याची टीका मलिक यांनी केली आहे. इतर पक्षातून आलेले आमदार स्वगृही परत जावू नयेत, या भीतीने राज्यात लवकरच सत्ता येणार असे भाजपकडून वारंवार सांगितलं जात आहे. परंतु महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकजुटीने काम करत आहेत. त्यामुळे आघाडीला कसलाही धोका नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

कोरोना, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस या अडचणी आलेल्या असतानाही या सर्व परिस्थितीला मात देवून राज्यातील जनतेला मदत करण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली. त्यामुळे जनता संतुष्ट आहे. मात्र सत्ता येणार… सत्ता येणार असे बोलून राज्यातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम भाजपचे नेते करत आहेत. त्यांचा हाच एककलमी कार्यक्रम असल्याची टीकाही त्यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button