डॉलर नरमाईने सोन्याच्या दरात वाढ
मुंबई : बुधवारी स्पॉट गोल्ड व्यवहार ०.७३ टक्क्याने वधारून जवळपास १७८४.१ डॉलर प्रतिऔंसवर बंद झाले. आधीच्या सत्रातही डॉलर नरमल्यामुळे डॉलर आधारित सोन्याला पाठबळ मिळून या मौल्यवान धातूच्या मूल्यात वाढ झाली असल्याचे एंजेल वन लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले.
यूएस फेडरलमधील काही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, लवकरच अमेरिकेची मध्यवर्ती बँक आर्थिक समर्थन मागे घेण्याची सुरुवात करू शकते. मात्र इतक्यातच व्याजदरांत वाढ करणे घाईचे ठरेल. परिणामी सोन्यातील दरांना आणखी तेजीचे समर्थन मिळू शकते. अमेरिकेतील ग्राहक दरांना नियंत्रणात ठेवण्यासाठी अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक अगदी पुढील महिन्यापासूनच आपले विस्तारवादी धोरण आणखी कठोर करण्याची सुरुवात करू शकते, असाही अंदाज बांधला जात आहे. अमेरिकी डॉलरमधील घसरण आणि वाढल्या चलनवाढीमुळे डॉलरआधारित सोन्याला पाठबळ देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कच्चे तेल: बुधवारी डब्लूटीआय क्रूड एका टक्क्याची वाढ नोंदवत प्रतिबॅरल ८३.९ डॉलर्सवर बंद झाले. एकीकडे अमेरिकेतील क्रूडचे साठे घटत आहेत, तर दुसरीकडे जगभरातील टंचाईच्या चिंतांमुळे बाजारातील भावनांना पाठबळ मिळाले. ऊर्जा माहिती प्रशासनाच्या (ईआयए) अहवालांनुसार, १५ ऑक्टोबर २०२१ ला संपलेल्या आठवड्यात अमेरिकेतील क्रूडचे साठे ४,३१००० ने घटले आहेत. बाजाराला मात्र साठ्यांत १.९ दशलक्ष बॅरल्सची वाढ होण्याची आशा होती.
तथापि, चीन कोळशाच्या दरांत कपातीकडे वाटचाल करत आहे, तर चलनवाढीच्या वाढत्या चिंतांमुळे क्रूडमधील तेजीची धार बोथट झाली आहे. कोळसा आणि नैसर्गिक वायूच्या किमती भडकल्या असतानाच चीनमध्ये तापमानाचा पारा घसरत चालला आहे. यामुळे आगामी दिवसांत तेल बाजारात पुरवठ्याचा ओघ घटणार असून किमती मात्र चढ्याच राहणार असल्याचे संकेत आहेत.
यासोबतच अमेरिकेतील हालचालींची आकडेवारी अपेक्षेपेक्षा कमकुवतच राहिली असून चीनच्या अर्थव्यवस्थेतील मंदावलेल्या हालचालींमुळे क्रूडच्या दरांत वाढ होण्याचा अंदाज बांधला जात आहे. बाधित तेलपुरवठा आणि विषाणूच्या उद्रेकामुळे जगातील प्रमुख तेल वापरकर्त्या देशांत अनिश्चितते वातावरण तयार होत आहे. यामुळे तेलातील तेजीला काहीसा लगामही लागू शकतो. एकीकडे अमेरिकेच्या क्रूडच्या साठ्यांत आलेली घट आणि डॉलरमधील नरमाई, तर दुसरीकडे बाजारातील तोकड्या पुरवठ्यामुळे क्रूड तेलाच्या किमतींना पाठबळ मिळतच राहील.