Top Newsराजकारण

होऊन जाऊदे ‘दूध का दूध, पानी का पानी’; नाना पटोलेंचे अमित शाहांना प्रतिआव्हान

केंद्र आणि राज्य सरकार बरखास्त करा आणि निवडणुका घ्या !

भंडारा : केंद्र सरकारच्या विरोधात जनतेचा राग असल्यामुळे आधी केंद्र सरकारनं राजीनामा द्यावा. केंद्रातील आणि राज्यातील दोन्ही सरकारं बरखास्त करा आणि निवडणुका घ्या. म्हणजे दूध का दूध, पानी का पानी होईल. लोकशाहीत गृहमंत्र्यांनी असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. लोकशाहीचा सन्मान करायला शिका, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय

अमित शाह यांनी पुण्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारला थेट दोन हात करण्याचं आव्हान दिलं आहे. ‘मी आजही सांगतो, हिंमत असेल तर राजीनामा द्या, दोन हात करा. तिन्ही पक्ष सोबत या, भाजपचा कार्यकर्ता लढण्यासाठी तयार आहे’, असं शाह म्हणाले. शाह यांच्या या आव्हानाला पटोले यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. सत्तेच्या गुर्मीत असलेले लोक असं वक्तव्य करतात, अशी खोचक टीका पटोले यांनी केली.

देशातील प्रधानमंत्र्यांनाच शोधावं लागतं. ते माध्यमांनाही भेटत नाहीत. ते फक्त टीव्हीवर भेटतात. देशाच्या अन्नदात्याला भेटायला त्यांना वेळ नाही. म्हणून कुणाला शोधावं लागेल हे तुम्हीच बघा, असा टोलाही पटोले यांनी लगावला आहे. तसंच चाकं कुणाची पंक्चर आहेत हे लोकशाहीत जनताच ठरवते, असंही ते म्हणाले. हिंदुत्व आणि हिंदू याबाबत राहुल गांधी यांनी केलेलं वक्तव्य महत्वाचं आहे. कोरोना काळात नदीत प्रेत वाहून जात असताना हिंदुत्व कुठे गेलं होतं? असा सवालही पटोले यांनी केला आहे.

शाहांचे आव्हान

ही लोकमान्य टिळकांची भूमी आहे. ते म्हणाले होते की, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. दुसरी शिवसेना असं म्हणते की सत्ता माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, कोणत्याही प्रकारे आम्ही तो घेणार. मी आजही सांगतो, हिंमत असेल तर राजीनामा द्या, दोन हात करा. तिन्ही पक्ष सोबत या, भाजपचा कार्यकर्ता लढण्यासाठी तयार आहे, असं थेट आव्हानच शाह यांनी यावेळी महाविकास आघाडीला दिलं होतं.

महाराष्ट्रातील सरकार तीन चाकाची रिक्षा आहे. या रिक्षाचे तिन चाकं तीन दिशेला आहेत. अन आता तिन्ही चाकं पंक्चर झाली आहे. जेव्हा ही रिक्षा चालते तेव्हा प्रदूषणाशिवाय काहीही बाहेर पडत नाही, अशी टीकाही शाह यांनी यावेळी केलीय. येणाऱ्या पुणे महापालिका निवडणुकीत लक्ष्य कमी ठेवू नका. पुण्यातील जनता तुम्हाला भरभरुन द्यायला तयार आहे, असा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button