Top Newsराजकारण

नवाब मलिकांच्या घरी ईडीचा छापा; ताब्यात घेऊन चौकशी सुरु

मुंबई : ठाकरे सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली आहे. नवाब मलिक यांच्या निवास्थानी भल्या पहाटे आलेल्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी मलिकांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात आणले असून, तिथे सकाळपासून त्यांची चौकशी सुरू आहे. कुर्ल्यातील जमीन व्यवहाराप्रकरणी नवाब मलिक यांची चौकशी करण्यात येत असल्याचे प्राथमिक वृत्त आहे. दरम्यान, या कारवाईमुळे राज्यातील राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

ईडीचे अधिकारी आज पहाटे ४.३० च्या सुमारास नवाब मलिक यांच्या निवासस्थानी आले. तेव्हा त्यांच्यासोबत सीआरपीएफचे जवान होते. मलिक यांना कारवाईची कल्पना दिल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी सकाळी साडेसात वाजता त्यांना ईडीच्या कार्यालयात आणले. त्यानंतर सकाळी पावणेआठ वाजल्यापासून मलिक यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, नवाब मलिक यांच्या निवासस्थानी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच ईडीच्या कार्यालयाबाहेरही बंदोबस्त वाढण्यात आला आहे.

काय आहेत आरोप?

मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध आहेत, असा आरोप ९ नोव्हेंबर २०२१ रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मलिकांनी दाऊद इब्राहिमच्या टोळीकडून जमीन खरेदी केलीय. या जमिनी मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या आहेत. मलिकांचे सरदार शाह वली खान आणि हसीना पारकर यांच्या जवळचा सलीम पटेलसोबत व्यावसायिक संबंध आहेत. या दोघांनी मलिकांच्या नातेवाईकांच्या एका कंपनीला मुंबईतील एलबीएस रोडवरची कोट्यवधींची जमीन कवडीमोल किमतीने विकलीय, असा आरोप फडणवीस यांनी केला होता.

फडणवीसांनी असाही आरोप केला होता की, या जमिनीची विक्री सरदार शाह वली खान आणि सलीम पटेलने केली होती. नवाब मलिकही यांचेही काही काळ या कंपनीशी संबंध होते. कुर्ला येथील एलबीएस रोडवरील या ३ एकर जमिनीची किंमत साडेतीन कोटींपेक्षा जास्त आहे. मात्र, ती केवळ २० ते ३० लाखांत विकली. याचे सर्व पुरावे आपण केंद्रीय संस्थांना दिले आहेत, असा दावाही केला होता. मलिकांची याबाबतच चौकशी सुरू असल्याचे समजते. मात्र, अजूनपर्यंत तरी ईडीकडून कसलीही माहिती देण्यात आली नाही.

दाऊदचा भाऊ इकबाल कासकर ईडीच्या कोठडीत आहे. त्याची नुकतीच चौकशी झालीय. विशेषतः दाऊद इब्राहीमच्या जवळच्या लोकांची मनी लॉन्ड्रिंगबाबत चौकशी सुरू आहे. त्यात कासकर ईडीच्या सात दिवसांच्या कोठडीत आहे. या चौकशीत कासकर आणि मलिक यांच्या कंपनीत जमीन व्यवहार झाल्याची काही पुरावे ईडीला मिळाल्याचे समजते. याप्रकरणात ईडीने दोन बिल्डरांनाही समन्स पाठवले आहे.

नवाब मलिक यांच्यावर करण्यात आलेली ही कारवाई सूडाचं राजकारण असल्याचा आरोप मलिकांच्या समर्थकांनी केला आहे. नवाब मलिकांचे कार्यकर्ते आता मोठ्या संख्येनं ईडी कार्यालयाबाहेर पोहोचून त्यांना समर्थन देणार असल्याचं सांगितलं जातंय. तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी ईडीच्या कारवाईमागे कोणत्याही प्रकारचं सूडाचं राजकारण नसल्याचं म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button