फडणवीसांना नाना पटोलेंची टीका चांगलीच झोंबली!
अकोला: देशाला स्मशानभूमी करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिण्याची हिंमत देवेंद्र फडणवीसांनी दाखवावी, असं आव्हान काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले होते. पटोले यांची ही टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना चांगलीच झोंबलेली दिसते. फडणवीसांनी या टीकेची दखल घेत पहिल्यांदाच पटोलेंना प्रत्युत्तर दिलं आहे. मी मोदींना नेहमीच पत्रं लिहित असतो, पण कांगावाखोरांना उत्तर देत नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.
फडणवीस आज अकोल्यात होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले यांच्यावर टीका केली. मी मोदींना नेहमीच पत्रं लिहीत असतो. महाराष्ट्राला आवश्यक ती मदत मोदींकडून मागत असतो आणि मोदींकडून ती मदत मिळतेही. महाराष्ट्राला सर्वाधिक व्हेंटिलेटर मोदींनी दिले. महाराष्ट्राला सर्वाधिक रेमडेसिवीर मोदींनी दिले. पण काहींना कांगावा करण्याची सवय आहे. अशा कांगावाखोरांना मी उत्तरे देत नाही, असं फडणवीसांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे पटोले यांच्या कोणत्याही प्रतिक्रियेवर फडणवीस प्रतिक्रिया देणं टाळतात. पटोले हे महाराष्ट्रातील राहुल गांधी आहेत. त्यांना काय उत्तर द्यायचं अशी फडणवीस हेटाळणी करत असतात. मी पटोलेंना महत्त्व देत नाही, त्यांच्या प्रतिक्रियेची काय दखल घ्यायची, असंही ते म्हणत असतात. मात्र काल पटोले यांनी केलेल्या टीकेवर फडणवीसांनी उत्तर दिलं. यावरून पटोलेंची टीका झोंबल्यानेच फडणवीस बोलते झाल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे.