
मुंबईः साऱ्या महाराष्ट्राला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा ‘लाव रे तो व्हिडीओ’ हा राजकीय प्रचार सभातला डॉयलॉग आठवत असेल. आज केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना या रंगलेल्या महानाट्यात त्याच्या पुढचा अंक पाहायला मिळाला. नारायण राणे यांनी काल ट्विट करून मातोश्रीवर ईडी धडकणार असल्याचा दिलेला इशारा आणि आज सकाळी दिशा सलीयन आणि सुशांतसिंग राजपूत या दोघांचे खून झाल्याचा आरोप केला. त्याची सव्याज परतफेड दुपारी शिवसेना नेते विनायक राऊत यांनी राणेंविरोधातले व्हिडिओ पत्रकार परिषदेत लावून केली. यातला एक व्हिडिओ तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आहे. त्यांनी त्यात राणेंची कुंडली माडल्याचा दावा राऊतांनी केला. तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये सध्या महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणारे भाजपनेते किरीट सोमय्या यांनी यापूर्वी राणेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
पत्रकार परिषदेत राऊत म्हणाले की, भाजप गुंडांचा पक्ष आहे. अंकुश राणेंचं काय झालं आणि तुम्ही सांगता भाजप गुंडांचा पक्ष? सिंधुदुर्गात कुणाचं काय काय सुरू आहे, हे जर मी सांगितलं तर तुमच्या लक्षात येईल, पण मी त्या खोलात जाणार नाही. जे काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्यांवर दगडफेक करू नये, अशा इशारही त्यांनी यावेळी दिला.
राऊत यांनी या पत्रकार परिषदेत दोन व्हिडिओ लावले. पहिल्या व्हिडिओमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांची कुंडली मांडली आहे, असा दावा राऊत यांनी केला. राणेंच्या नेतृत्वात नऊ वर्ष सिंधुदुर्गात खंडणी, मारामारी होत होती. त्यात मंचेकर गोवेकर, सत्यविजय भिसे यांचे निर्घृणपणे खून कोणी केला. ते कोणी पचवले. श्रीधर नाईकांच्या खुनात आरोपी कोण होतं, हे सर्वांना माहीत आहे. आम्हाला उघड करायला लावू नका. राणेंच्या कुंडलीचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत वाचन केलं होतं. हे व्हिडिओ लावून सांगत राऊत यांनी राणे यांच्यावर कोणकोणते गुन्हे आहेत, या आरोपांचा पाढा वाचला. आता ज्या – ज्या गुन्ह्यांचा अंतर्भाव केला होता, काही करायचा राहिला आहे. शिवाय सिंधुदुर्गातील आजवरच्या राजकीय हत्यांची चौकशी करा. खरे गुन्हेगार आणि प्लॅनर कोण होते, याची चौकशी करा अशी मागणी करणार असल्याचे ते म्हणाले.
जुनी थडगी उकरली जाणार; थेट गृहमंत्र्यांकडे चौकशीची मागणी
नारायण राणे यांनी आमच्यावर केलेले आरोप निराधार आहेत. त्यांच्या आरोपांची दखल घ्यावी असे वाटत नाही. पण राणेंना वाढत्या वयामुळे विस्मरण होत असेल. मुलांच्या उपदव्यापामुळे त्यांना स्मरणात राहत नसेल तर त्यांना त्यांचा भुतकाळ सांगावा लागेल. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची उद्या आम्ही भेट घेणार आहोत. त्यांना या राजकीय हत्यांची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत, असं शिवसेना नेते विनायक राऊत यांनी सांगितलं.
एका केंद्रीय मंत्र्याने ईडीच्या नावाचा दुरुपयोग करून एखाद्याला धमकी देणं हा मंत्रिपदाचा दुरुपयोग आहे. ईडीच्या नोटीसा येणार आहेत असं सांगणं म्हणजे ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी केलेली हातमिळवणी असेल किंवा त्यांनी ईडीच्या कार्यालायातून कागदपत्रे तरी चोरली असतील. त्याशिवाय ते सांगू शकणार नाहीत. राज्यात ईडीचे उपद्व्याप सुरू आहेत. केंद्रीय मंत्र्याने ईडीच्या नावाने धमकी देणं हा गंभीर प्रकार आहे. याप्रकरणी संसदेत आवाज उठवणार आहोत. पंतप्रधानांच्या निदर्शनासही आणून देणार आहोत. स्वायत्त संस्थेला बदनाम करत आहेत. ईडीच्या कार्यालयातून कागदपत्रांची चोरी केंद्रीय मंत्री करत असावेत, त्यामुळेच ते असा दावा करत असावेत, असा हल्लाबोलही त्यांनी चढवला.
यावेळी विनायक राऊत यांनी राणेंवर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काय आरोप केले होते. त्याचे व्हिडिओ दाखवले. लाव रे तो व्हिडिओ सांगत राऊत यांनी तीन व्हिडीओ दाखवून राणेंचा पर्दाफाश केला. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना विधान परिषदेत राणेंची कुंडली मांडली होती. सिंधुदुर्गातील काही खुनांबद्दलही फडणवीस यांनी भाष्य केलं होतं. त्यामुले आम्ही उद्या दिलीप वळसे पाटील यांना भेटून सिंधुदुर्गातील आजवरच्या राजकीय हत्यांची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत. या हत्यांमागचे खरे गुन्हेगार आणि प्लानर कोण होते त्याची चौकशी करण्याची त्यांच्याकडे मागणी करणार आहोत, असं राऊत म्हणाले. राणे आणि त्यांच्या मुलांनी ३०० कोटींचा घोटाळा केला होता. अविघ्न पार्क सोसायटीत हा घोटाळा झाला होता, असं सोमय्या बोलत असतानाचा व्हिडिओही त्यांनी यावेळी दाखवला.




