लखीमपूर खिरी : लखीमपूर प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांचा मुलगा आशिष याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पण त्याला वा अन्य कोणालाही अटक केलेली नाही. त्यामुळे शेतकरी संतापले आहेत. मृत तरुण शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला आहे. तथापि, अन्य तीन मृत शेतकऱ्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. आशिष मिश्रच्या सांगण्यावरूनच आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालण्यात आले, असा आरोप केला जात आहे. आशिष मिश्रविरुद्धच्या एफआयआरची प्रत आपणास मिळावी आणि ऑटोप्सीचा अहवालही देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी केली. ही कागदपत्रे मिळेपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. मृतावर अंत्यसंस्कार करण्यात यावेत, यासाठी पोलीस व प्रशासन दबाव आणत आहे, अशी तक्रार शेतकरी करीत आहेत.
केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र यांच्या ताफ्यातील वाहनाने चार शेतकऱ्यांना चिरडून ठार केल्याच्या प्रकाराला दोन दिवस उलटूनही पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. चारही शेतकऱ्यांच्या मृतदेहांचे पोस्टमॉर्टेम झाले असून, वाहनाने चिरडल्यामुळे मृत्यू झाल्याचे त्यातून उघडकीस आले आहे. तसेच मंत्र्यांच्या ताफ्यातील एक वाहन ठरवूनच शेतकऱ्यांच्या अंगावर घालून, त्यांना ढकलत नेऊन चिरडले, असा व्हिडिओही समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झळकू लागल्याने भाजपची अडचण झाली आहे. त्यामुळे शेतकरीच वेगाने चाललेल्या वाहनाच्या समोर आल्याने अपघात झाला, असे ते सांगत आहेत.
लवप्रीत कामासाठी घरातून बाहेर पडला होता. काही वेळाने त्याचा रुग्णालयातून फोन आला. लवकर रुग्णालयात या, असे त्याने आपणास सांगितले. आम्ही लगेच रुग्णालयात गेलो. पण, तोपर्यंत माझा १९ वर्षांचा मुलगा मरण पावला होता, अशी माहिती त्याच्या वडिलांनी दिली. ते म्हणाले, ज्यांनी मुलास चिरडून ठार मारले, त्यांना आधी अटक झालीच पाहिजे. कशा पद्धतीने मुलाला मारण्यात आले, त्या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. तरीही पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करीत आहेत.