Top Newsराजकारण

१२ आमदार नियुक्तीचा तिढा : महाविकास आघाडीचे नेते १ सप्टेंबरला राज्यपालांना भेटणार

मुंबई : विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या मुद्द्यांवरुन पुन्हा एखदा राज्यातील राजकारण रंगताना दिसून येत आहे. महाविकास आघाडी सरकारकडून राजभवनाकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीची वेळ मागण्यात आली होती. पण राजभवनाकडून वेळ देण्यात आली नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे संध्याकाळच्या सुमारास शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर राजभवनावर दाखल झाले होते. त्यांनी राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली. त्यानंतर राजभवनाकडून १ सप्टेंबरला भेटीसाठी वेळ दिलीय. त्यामुळे आता १ सप्टेंबरला १२ आमदारांच्या नियुक्तीचा तिढा सुटणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजभवनाकडे वेळ मागितली होती, पण वेळ दिली गेली नाही, असं म्हटलंय. तर दुपारी ४ वाजेपर्यंत राज्य सरकारकडून राजभनवाकडे वेळ मागण्यात आली नव्हती. तर दुपारी ४ ते संध्याकाळी ६.३० वाजेपर्यंत राज्यपाल कोश्यारी यांचे नियोजित कार्यक्रम होते, असं राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत संध्याकाळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे राजभवनावर दाखल झाले. त्यांनी राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली. त्यानंतर राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना १ सप्टेंबरचा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आता १ सप्टेंबरला राज्यपालांच्या भेटीसाठी जाणार आहेत. त्यावेळी १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न मार्गी लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

विधान परिषदेच्या १२ आमदारांची नियुक्ती झाल्यास भाजपमध्ये फूट पडेल अशी भीती भाजपला वाटत आहे. त्यामुळेच त्यांनी इतके दिवस आमदारांची नियुक्ती रखडून ठेवली आहे. आज राज्य सरकारकडून राजभवनाकडे वेळ मागण्यात आली होती. मात्र, त्यांनी वेळच दिली नाही असं पटोले यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री कार्यालयातून विचारण्यात आली होती की आम्हाला वेळ देण्यात यावी. त्यांनी कळवतो असं सांगितलं पण कळवण्यात आलं आहे. आता मुख्यमंत्री कार्यालयातूनच नार्वेकरांना वेळ घेण्यासाठी पाठवलं आहे, असं पटोले म्हणाले.

राज्यपाल भवन हे भाजपचं कार्यालय झालं आहे, असा आरोप सातत्यानं करण्यात येत आहे. राज्यपालांनी या नियुक्त्या का थांबवल्या? हायकोर्टानं यात हस्तक्षेप करावा ही लाच्छनास्पद बाब आहे. भाजपाचा मोठा दबाव आहे. भाजपमध्ये आयात केलेले नेते आहेत, त्यांना त्यांनी थोपवून ठेवलं आहे. भाजप सातत्याने सरकार पाडायच्या बाता करत आहे. त्यांना या १२ जागांवर आपले लोक बसवायचे आहेत. त्यामुळे भाजप हा डाव राज्यपालांच्या माध्यमातून खेळत आहे, असा गंभीर आरोपही पटोले यांनी यावेळी केलाय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button