Top Newsराजकारण

…आणि पंतप्रधानांसमोर अजितदादांनी टोचले राज्यपालांचे कान !

पुणे : मेट्रो आणि १४० ईलेक्ट्रीक बसेससह इतर महत्वाच्या योजनांचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीच राज्यपालांचा नामोल्लेख टाळून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चांगलेच कान टोचले. स्पष्ट आणि रोखठोक बोलण्यासाठी ओळखले जाणारे अजितदादा आजही स्पष्ट आणि थेटच बोलले.

पुण्यातील आजच्या जाहीर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, अलिकडे बऱ्याच काही गोष्टी घडताहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मला एक गोष्ट निदर्शनास आणून द्यायची आहे. अलिकडं महत्त्वाच्या पदांवर सन्माननीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य होत आहेत. ती वक्तव्य महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तीला पटणारी नाहीत. ती मान्य देखील नाहीत.

एमआयटी कॉलेजच्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पुणे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी अजित पवारांनी आज उद्घाटन झालेल्या पुण्यातील प्रकल्पावर समाधान व्यक्त करताना म्हणाले की, पुणेकरांच्या सहनशीलतेला खऱ्या अर्थानं दाद दिली पाहिजे. १० जूनला पुणे महानगर पालिकेने ठराव पास केला होता की आपल्याला मेट्रो हवी. त्यानंतर १२ वर्ष सुरू करायला लागली. मधल्या काळात काही लोकप्रतिनिधींच्या हट्टासाठी ती जमिनीवर करायची की अंडरग्राऊंड यामध्येच बराच वेळ गेला. पण नंतर गडकरींनी कठोर भूमिका स्वीकारली आणि मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली. पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांना मेट्रोच्या कामामुळे खूप त्रास सहन करावा लागला. अजून काही काळ तो त्रास सहन करावा लागणार आहे.

त्याचबरोबर पंतप्रधानांना मला विनंती करायची आहे, की अजूनही पिंपरी चिंचवड ते निगडी, स्वारगेट ते कात्रज आणि पुण्यातल्या वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली, स्वारगेट ते हडपसर, हडपसर ते खराडी आणि खराडी ते स्वारगेट या जोडमार्गांचा अहवाल तयार करायचे काम सुरू आहे. जसे आत्ताच्या मेट्रोमध्ये ५० टक्के केंद्र सरकार, ५० टक्के राज्य सरकारचा निधी आहे, त्याचप्रकारे या बाकीच्या मार्गांसाठी देखील केंद्राची मदत झाली, तर पुणेकरांसाठी मोठं काम होईल अशी विनंती वजा मागणीही त्यांनी यावेळी केली.

पंतप्रधानांच्या लक्षात मी एक बाब आणू इच्छितो. अलिकडे महत्त्वाच्या पदांवरील सन्माननीय व्यक्तींकडून अनावश्यक वक्तव्य होत आहेत. ती वक्तव्य महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला न पटणारी आहेत. ती मान्य देखील होणारी नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी, राजमाता जिजाऊंनी रयतेचं स्वराज्य स्थापन केले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंनी देशात स्त्रीशिक्षणाचा पाया रचला. या महामानवांच्या उत्तुंग विचारांचा वारसा आपल्याला महाराष्ट्रात पुढे न्यायचा आहे. मनात कुणाच्याही बद्दल आसूया न ठेवता, विकासकामात राजकारण न करता हा वारसा आपल्याला पुढे न्यायचा आहे हे मी नम्रतापूर्वक सांगतो असे सांगत राज्यपालांचे नाव न घेता अजित पवार यांनी तक्रार केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button