मुक्तपीठ

गो कल्याण, देश कल्याण !

- मुकुंद परदेशी (संपर्क ७८७५० ७७७२८)

एखादा माणूस ‘नॉर्मल’ नसला म्हणून तो काय ‘अँबनॉर्मल’च असतो का ? तो दोघांच्या मधलाही असू शकतो ना ? एखादी व्यक्ती ‘स्त्री’च असायला हवी, नाहीतर ‘पुरुष’च असायला हवी असा आग्रह कसा धरता येईल ? ती व्यक्ती या दोघांच्या ‘मधली’ असू शकत नाही का ? म्हणूनच तर ,’मी काय ‘नॉर्मल माणूस’ वाटलो की काय, असं एखादया माणसाने विचारताच वेड्यांचा इस्पितळात जाऊन त्याच्या नावाचा केसपेपर तयार करणे याच्या सारखा वेडेपणा दुसरा नाही. तो ‘नॉर्मल’ आणि ‘अँबनॉर्मल’ या दोघांच्या मधला , म्हणजे ‘अर्धवट’सुद्धा असू शकतो ना ? आता जी गोष्ट ‘नॉर्मल’, ‘अँबनॉर्मल’ची तीच गोष्ट ‘ग्रेट’ आणि ‘ कॉमन’ ची ! आम्ही भलेच ‘चिंता करितो विश्वाची’ म्हणणाऱ्या रामदासस्वामीं इतके ‘ग्रेट’ नसू , पण फक्त आपल्याच पोटापाण्याची चिंता करण्याइतके ‘कॉमन’सुद्धा नाहीत. आम्हीसुद्धा ‘ ग्रेट’ आणि ‘कॉमन’ यांच्या मधलेच आहोत. अगदी विश्वाची नाही तरी आपल्या देशाची चिंता आम्हाला आहे. आपल्या देशाचं कल्याण कधी होईल, कसंं होईल ही चिंता आम्हाला दिवसरात्र छळत असते. महागाई, भ्रष्टाचाराने जसे सामान्यांचे जीवन पोखरले जाते , एकेका मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आल्यामुळे जसे एखादे सरकार पोखरले जाते, तसा आमचा मेंदू या चिंतेने पोखरून टाकला होता. एखाद्या न उजवल्या जाणाऱ्या मुलीच्या बापाला जसा एकच घोर लागलेला असतो, त्याला जशी एकच चिंता लागून राहिलेली असते की, मुलगी कशी उजवायची ; तसाच आम्हाला एकच घोर लागून राहिलेला होता , एकच चिंता लागून राहिली होती की , आपल्या देशाचं कल्याण कसं होईल ? त्यासाठी आम्ही अनेक विद्वानांशी, बुध्दिवाद्यांशी चर्चा केली. कोणी म्हणे देशाचे कल्याण करण्यासाठी लोकसंख्या आटोक्यात आणावी लागेल, कोणी म्हणे शिक्षणाचा प्रसार करावा लागेल , कोणी म्हणे उद्योगधंदे वाढवायला हवेत, कोणी म्हणे रोजगार वाढवायला हवा. कोणी काय म्हणतोय तर कोणी काय सुचवतोय. एक विद्वान तर म्हटले की , आपल्या देशाचं नावच बदलून ‘कल्याण’ ठेवावं ; म्हणजे देशाचं आपोआपच ‘कल्याण’ होऊन जाईल ! आम्हाला यातलं काहीच पटलं नाही. आता नाहीच पटलं तर ताबडतोब पक्ष बदलण्याची सोय फक्त राजकारणातच असते. आपल्यासारख्यांना पटलं नाही तरी पटवून घ्यावंच लागतं . अगदीच नाहीच पटवून घेतलं तर निदान धकवून तरी घ्यावंच लागतं. ( तमाम विवाहित पुरुषांची व्यथा अचूकपणे मांडल्याचं श्रेय आम्हालाच मिळायला हवं .) अगदी तसंच आम्ही सर्व धकवून घेत होतो, आपल्या देशाचं कोणत्या का मार्गाने होईना पण कल्याण व्हावं म्हणून जीव नुसता तळमळत होता, पण म्हणतात ना की , इच्छा तिथे मार्ग !

आमची देशाच्या कल्याणाची इच्छाच इतकी पॉवरफुल होती की, आम्हाला मार्ग सापडला ! नुसताच मार्ग नाही तर महामार्ग सापडला !! प्रत्यक्ष अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायाधीशच आमच्या मदतीला धावले. त्यांनी तर थेट सरकारलाच सल्ला देऊन टाकला की, ‘ गाईंचे कल्याण कराल तरच देशाचे कल्याण होईल.’ या निर्बुधांच्या देशात इतका सोपा प्रश्न सोडविण्यासाठी थेट हायकोर्टाच्या न्यायाधीशांना आपला अमूल्य वेळ वाया घालवावा लागला. आता हायकोर्टाचा निकाल म्हणजे ब्रम्हवाक्यच की ! त्याच्या विरोधात जायला आपण का ‘100 कोटींच्या क्लब’ चे मेंबर आहोत का ? आता हा उपाय लगोलग सर्वांनीच अंमलात आणायलाच हवा. त्यासाठी हवं तर सरकारने घरटी एक गाय पाळणे बंधनकारक करणारा अध्यादेश काढावा. उगाच शिका , नोकरी करा, उद्योगधंदा करा, राष्ट्राचं उत्पन्न वाढवा अशा निरर्थक आणि नपुंसक गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा आता प्रत्येकाने गाय पाळावी. गाय खरेदीसाठी प्रत्येक बँकेने विनातारण कर्ज द्यावे. त्यासाठी रोज एक लिटर दुध मॅनेजरच्या घरी पोहचवावे लागेल, अशी अट कोणत्याही मॅनेजरने घालू नये.

जाता जाता – सरकारनेही आता समाजकल्याण खात्याच्या धर्तीवर नवीन गोकल्याण खाते निर्माण करावे . अर्थात समाजकल्याण खात्यामुळे समाजाचं कल्याण कधीच झालं नाही, पण समाजापेक्षा गाय जास्त महत्वाची असल्यामुळे कदाचित तिचं आणि पाठोपाठ देशाचंही कल्याण होईल अशी आशा बाळगायला काय हरकत आहे ?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button