स्मशानभूमीबाहेर मृतदेहांचे ढीग; कोरोना रुग्णांना मृत्यूनंतरही नरक यातना
स्मशनात जागा नाही, पुरलेले मृतदेह कुत्र्यांनी बाहेर काढले; बुलडाण्यात संतापजनक प्रकार
अजित पवार, राजेश टोपे, एकनाथ शिंदेंची बैठक; मृतदेहांच्या विल्हेवाटीवर चर्चा
मुंबई : देशात दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होताना दिसत आहे. दररोज देशात लाखो रुग्ण आढळून येत असून चिंताजनक बाब म्हणजे कोरोनाची ही दुसरी लाट अति गंभीर असल्याचे बोले जात आहे. कारण याचा प्रादुर्भाव अधिक वेगाने होत असून मृत्यू दर देखील अधिक आहे. त्यामुळे दुसऱ्या लाटेत अनेकांनाचे प्राण वाचवणे देखील फार कठीण झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे मृत्यूनंतरही कोरोना रुग्णांना नरक यातना सहन कराव्या लागत आहेत. बरेच नातेवाईक मृत्यू झाल्यानंतर त्या व्यक्तीचा मृतदेह ही घेऊन जात नाही. त्यामुळे बरेच मृतदेह रुग्णालयातच पडून राहतात. दरम्यान, सूरतमध्ये तर कोरोनाच्या मृतदेहावर आणि नॉन कोविड रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अक्षरश: लांबच्या लांब रांगा लावाव्या लागत आहेत. तर काही जण मृतदेहावर लवकर अंत्यसंस्कार करुन घ्यायचे असल्यास पैसे द्या, अशी देखील मागणी करत आहे. त्यामुळे सध्या देशात कोरोनाचे भयंकर रुप पाहायला मिळत आहे.
दरम्यान, बुलढाण्यात वैकुंठधाम स्मशानभूमीत पुरलेल्या मृतदेहांची अवहेलना होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. मोकाट कुत्रे जमीन उकरुन मृतदेहांचे लचके तोडत असल्याचे दुर्दैवी चित्र पाहायला मिळत आहे. आपल्या आप्तांचे मृत्यूनंतरचे हाल पाहून जनभावना दुखावल्या जात आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूरमधील वैकुंठधाम स्मशानभूमीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक आहे. सध्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित आहेत. याशिवाय तिन्ही विभागाचे सचिवदेखील बैठकीत हजर आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणाऱ्या या बैठकीमध्ये मृतदेह विल्हेवाट, ऑक्सिजन लिक्विड प्लान्ट, आर्थिक पॅकेज यावर चर्चा होणार आहे.
गुजरातमध्येही कोरोनाचा कहर
कोरोनाचा कहर हा केवळ महाराष्ट्र राज्यातच नाही तर गुजरातमध्ये देखील पाहायला मिळत आहे. गुजरातच्या सूरतमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ होताना दिसत आहे. याठिकाणी स्मशानभूमीच्या बाहेर अक्षरश: मृतदेहांचे ढीग पाहायला मिळतात. तर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील लांबच्या लांब रांगा लागलेल्या असतात. त्याठिकाणी मृतदेहाच्या नातेवाईकांना टोकन दिले जाते. त्या टोकननुसार नंबर आल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतात. तोपर्यंत तात्काळत स्मशानभूमी बाहेर बसावे लागते.
पैसे घेऊन केले जातात अंत्यसंस्कार
गुजरातमधील एका स्मशानभूमीत पैसे घेऊन लवकर अंत्यसंस्कार करण्याचे प्रकरण समोर आले आहे. एखाद्या मृतदेहावर तात्काळ अंत्यसंस्कार करायचे असल्यास त्या व्यक्तीच्या नातेवाईकांकडून दीड ते दोन हजार घेतले जातात. त्यामुळे काही नातेवाईक पैसे देऊन अंत्यसंस्कार करुन घेतात. त्यामुळे आधी आलेले नागरिक त्याठिकाणीच तात्कळत बसतात. सामाजिक कार्यकर्ता हरिश गुज्जर हे आपल्या जवळच्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कार करण्यासठी गेले होते. त्या दरम्यान, त्यांनी हा धक्कादायक प्रकार पाहिला. त्यामुळे आता पुढील काही दिवसात कोरोनाचे अजून कोणते रुप पाहायला मिळणार, अशी भिती नागरिकांच्या मनात आहे.
बुलडाण्यात मृतदेहांची अवहेलना
बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात नदीकाठावर माता महाकाली वॉर्ड परिसरात वैकुंठधाम स्मशानभूमीची निर्मिती करण्यात आलेली आहे. या स्मशानभूमीची नदी पात्राकडील संरक्षण भिंत गेल्या काही वर्षांपासून पडलेली आहे. त्यामुळे नदी पात्राकडून ही स्मशानभूमी उघडीच आहे. या स्मशानभूमीमध्ये सर्वधर्मीय व्यक्तींच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येतात. अग्नीडाग देणे किंवा मृतदेहाचे दफनही इथे केले जाते. मात्र या ठिकाणी गाडण्यात येणाया मृतदेहांची अवहेलना होत असल्याचा प्रकार काही दिवसांपासून होत आहे. बुलडाणा शहरातील आणि परिसरातील मोकाट कुत्रे हे स्मशानभूमीत जाऊन तिथे दफन केलेले मृतदेह उकरुन काढतात. त्यानंतर ती फरफटत नेण्याचाही प्रकार घडत आहेत. तर काही मृतदेहांचे लचके तोडल्याचा प्रकारही समोर आला आहे. काही मृतदेहांचे सांगाडे परिसरात पडलेले आढळून आल्यानंतर अनेकांनी रोष व्यक्त केला आहे. वैकुंठ स्मशानभूमीत सध्या अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. मात्र या स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. तेव्हा समाज पुढाऱ्यांनी समोर येत या प्रकाराला आळा घालण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात आणि संरक्षण भिंतीचा प्रश्न तातडीने मार्गी लावून मृतदेहांची अवहेलना थांबवावी, अशी मागणी जनसामान्यांमधून केली जात आहे.
भंडाऱ्यातही कुत्र्यांकडून मृतदेहांची विटंबना
कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा मृतदेह जाळण्यासाठी सरणावर लाकडे कमी पडत आहेत. त्यामुळे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेहांचे लचके कुत्रे तोडत असल्याचं नुकतंच भंडारा जिल्ह्यात उघडकीस आलं होतं. कुत्रे हे मांस घेऊन गावात जात असल्यानं भंडाऱ्यातील स्मशानभूमीच्या आजूबाजूच्या गावात घबराट पसरली होती. स्मशानभूमी इतरत्र हलवण्याची मागणी गावकऱ्यांनी केली.