इतर

दाभोलकर, पानसरे यांचे मारेकरी अद्याप फरार; हायकोर्टाचे तपास यंत्रणांना खडेबोल

मुंबई: अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी तपास लांबत चालल्याने पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टाने तपास यंत्रणांना खडेबोल सुनावले व कर्नाटकातील अशाच प्रकारच्या घटनांचा दाखला देत तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या घटनेला आठ वर्षे झाली आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येला सहा वर्षे झाली. असा आणखी किती काळ तुमचा तपास सुरू राहणार? कर्नाटक राज्यात नंतर झालेल्या विचारवंतांच्या हत्यांच्या घटनांप्रकरणी खटलाही सुरू झाला असेल तर इथे आपल्या राज्यात अजून खटले सुरू का झाले नाहीत?, असा खडा सवालच मुंबई हायकोर्टाने सीबीआय आणि एसआयटीला विचारला.

‘आम्ही दोन्ही तपास यंत्रणांच्या कामाविषयी शंका घेत नाही पण प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू असल्याचे दिसले पाहिजे, अन्यथा जबाबदार अधिकाऱ्यांपैकी कोणालाही सोडणार नाही,’ असा स्पष्ट इशारा यावेळी मुंबई हायकोर्टाने या प्रकरणी तपास करत असलेल्या सीबीआय आणि एसआयटीला दिला.

‘अशाने लोकांच्या विश्वासाला तडा जातो. शेवटी अशा संवेदनशील प्रकरणांत तपास गांभीर्याने होतोय आणि खटलाही चालवला जातोय, असा संदेश लोकांमध्ये जाणेही आवश्यक आहे. अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, याची खबरदारी घेणेही आवश्यक आहे’, असे आपले निरीक्षणही न्या. संभाजी शिंदे व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठाने नोंदवले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button