चीनमधील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीने पुन्हा वाढवली चिंता, रशियात २४ तासांत १०७५ जणांचा मृत्यू !
शांघाय/मास्को : चीन आणि रशियातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येनं पुन्हा एकदा धाकधूक निर्माण झाली आहे. चीनमध्ये शनिवारी ३८ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर रशियात कोरोनाचा विस्फोट झाल्याचं पाहायला मिळत आहे. रशियात गेल्या २४ तासांत तब्बल ३७,६७८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे १०७५ जणांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात मृत्यू झालेली ही सर्वाधिक आकडेवारी आहे.
चीनची राजधानी बिजिंगमध्ये शनिवारी कोरोनाचे एकूण ९ रुग्ण आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर शहरात कडक नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. प्रशासनानं चाचण्याचं प्रमाण वाढवलं आहे आणि हॉटेलमधील बुकिंग रद्द करण्यात येत आहेत. बिजिंगमध्ये पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण मंगोलियाच्या स्वायत्त भाग, निंग्शिया आण शांक्सी प्रांतात प्रवास करुन आले होते. १२ ते १५ ऑक्टोबर दरम्यान त्यांना हा प्रवास केला असून १६ ऑक्टोबर रोजी ते बिजिंगमध्ये परतले होते.
रशियात शनिवारी कोरोनामुळे तब्बल १०७५ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. सरकारच्या कोरोना व्हायरस टास्क फोर्सच्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत ३७,६७८ नवे रुग्ण आढळले आहेत. तर सप्टेंबरच्या अखेरपर्यंत नोंदविण्यात आलेला दैनंदिन मृत्यूदर जवळपास ३३ टक्क्यांहून अधिक आहे. तर गेल्या महिन्यातील कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनुसार रुग्णसंख्येत जवळपास ७० टक्क्यांची वाढ झाली आहे.