नवी दिल्ली: काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्लीत आले आहेत. दिल्लीत त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. त्यानंतर पटोले यांनी महाराष्ट्रात काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. राहुल यांच्या भेटीनंतर नानांनी थेट स्वबळाची भाषा केल्याने काँग्रेस निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्यासोबत राहणार नसल्याचं स्पष्ट होत आहे.
विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे. तीन वर्ष बाकी आहे. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढेल. सरकार आणि संघटना या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. त्याला सर्व पक्षांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे हा वाद संपलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे, यात काही वादच नाही, असं नाना पटोले म्हणाले. राहुला गांधी यांच्याशी आज चर्चा झाली. यावेळी केसी वेणुगोपलही उपस्थित होते. महाराष्ट्रात आज जी काय स्थिती आहे. इतर पक्षांची. त्यात काँग्रेसचा बेस सर्वाधिक आहे. त्यामुळे काँग्रेसचा बेस नियोजनबद्ध कसा वाढवायचा त्यावर सखोल चर्चा या बैठकीत झाली, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले. इतर केंद्रीय मंत्र्यांना भेटले. त्याकडे तुम्ही कसं पाहता, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर, ही त्यांच्या पक्षाची अंतर्गत गोष्ट आहे. त्यांनी कुणाला भेटावं किंवा भेटू नये हा त्यांचा निर्णय आहे. सध्या मोदी सर्व जनतेची हेरगिरी करत आहे. लोकांच्या प्रायव्हसीला धोका पोसवण्याचं काम मोदी आणि भाजप करत आहे. काँग्रेस हेरगिरी करण्याचं काम करत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
फडणवीस सरकारच्या काळात २०१६-१७ मध्ये माझे फोन टॅप झाले होते. सत्ताधारी आणि विरोधकांचेही फोन टॅप झाले होते. त्याबाबत मी विधानसभेत आवाज उठवला होता. त्याची चौकशी सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, राज्यात काँग्रेसच्या काही मंत्र्यांना डच्चू देण्यात येण्याच्या चर्चांना त्यांनी पूर्णविराम दिला. मंत्र्यांना डच्चू देण्यात येण्याच्या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. सध्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार नाही. तशी काही चर्चा महाविकास आघाडीत चर्चा झाली नाही. पुढच्या काळात फेरबदल होणार की नाही याचा निर्णय हायकमांड घेईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.