चुकीच्या वेळेस चुकीच्या गोष्टी सुरु आहेत : वळसे-पाटील

पुणे: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई व नागपूर येथील घरी आज ईडीनं छापे टाकले आहेत. ईडीच्या या कारवाईमुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ईडीच्या कारवाईचा निषेध करत देशमुख यांच्या घरासमोर आंदोलनाला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देशमुख यांच्या घरावरील छाप्यांबाबत वळसे-पाटील यांनी नाराजी दर्शवली. यावर मी अधिक बोलणार नाही. पण चुकीच्या वेळेस चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत. सध्याच्या परिस्थितीत सर्वांचं लक्ष करोनाकडं असायला हवं. कुणी काहीही मागणी केली म्हणून लगेच चौकशी होत नाही. सीबीआय चौकशीसाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल, असं वळसे-पाटील म्हणाले.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपांनंतर सीबीआयने देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. कोलकाता येथे दोन बनावट कंपनीचे दस्तऐवज सीबीआयला आढळले होते. या बनावट कंपनीद्वारे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले. ते देशमुखांशी संबंधित असल्याचा संशय सीबीआयला आला. त्यानंतर या प्रकरणात ईडी सक्रिय झाली. ईडीने गुन्हा दाखल केला.




