Top Newsराजकारण

भाजप अत्यंत खोटारडा, विखारी व कांगावाखोर; ‘टूलकिट’ प्रकरणावरुन काँग्रेसचा भाजपवर पलटवार

मुंबई : कोरोना व्हायरसला मोदी व्हायरस किंवा इंडियन व्हायरस असं म्हणण्याचं आवाहन एका टूलकिटद्वारे करण्यात येत आहे. हे टूलकिट सोशल मीडियावर काँग्रेसच्या नावानं व्हायरल होतंय. अशावेळी भाजपकडून काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला जात आहे. तर काँग्रेस नेत्यांकडून भाजपवर पलटवार सुरु आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपला प्रत्युत्तर देत भाजप अत्यंत खोटारडा, विखारी आणि कांगावाखोर पक्ष असल्याची टीका केलीय. टूलकिटवरुन सुरु झालेलं हे राजकारण आता चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे.

भाजप अत्यंत खोटारडा, विखारी व कांगावाखोर पक्ष आहे. ‌सदर टूलकिट हे बनावट आहे. काँग्रेसकडून जे. पी. नड्डा आणि संबित पात्रा यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यात अतुल भातखळकर यांचंही नाव देऊ. मोदींची कोविड हाताळण्यातील अपयशाने डागळलेली प्रतिमा सावरण्यासाठी हा बनाव भाजपाने रचला आहे, अशा शब्दात सचिन सावंत यांनी भाजपला इशारा दिला आहे.

भातखळकरांचा खोचक सवाल

दरम्यान, टूलकिटवरुन भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला होता. ‘काँग्रेसचे टूल किट खलिस्तान्यांच्या टूल किटपेक्षा कमी खतरनाक नाही. ‘इंडियन व्हायरस, मोदी व्हायरस असे शब्द सोशल मीडियातून व्हायरल करा’, असे आदेश यातून काँग्रेस कार्यकर्त्यांना दिले आहेत. सत्तेसाठी काँग्रेस देशद्रोह्यांना पुढे करू शकते वेळ आल्यास देशद्रोहही करू शकते. भारताचा शत्रू नंबर १ असलेल्या चीनशी काँग्रेस पक्षाचा २००८ पासून करार आहे. त्यामुळे सगळे जग जरी कोरोनाला चायनीज व्हायरस म्हणत असले तरी काँग्रेस मात्र याला इंडियन व्हायरस म्हणणार. मोदी व्हायरस म्हणणार. चीनने राजीव गांधी फाऊंडेशनला भरभरून देणग्या दिल्या आहेत त्याची परतफेड नको?’, असा खोचक सवाल अतुल भातखळकर यांनी काँग्रेस नेत्यांना विचारलाय.

भाजप नेत्यांविरोधात काँग्रेसची तक्रार

टूलकिट प्रकरणी भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार वाद रंगला आहे. या प्रकरणी भाजपने सोशल मीडियावरून काँग्रेसविरोधात खोटी माहिती पसरवली आहे. काँग्रेसची बदनामी करून भाजपने देशात अशांतता निर्माण करण्याचं काम केलं आहे. त्यामुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, भाजप नेत्या स्मृती ईराणी, संबित पात्रा आणि बी. एल. संतोष यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसने दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना तशी चिठ्ठीच लिहिली आहे.

काँग्रेसने दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना एक चिठ्ठी लिहिली आहे. त्यात जेपी नड्डा, संबित पात्रा, स्मृती ईराणी, बीएल संतोष यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे. या लोकांनी देशात अशांतता निर्माण करण्याचा आणि जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी सोशल मीडियातून चुकीची आणि खोटी माहिती पसरवून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे, असं काँग्रेसने या चिठ्ठीत म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button