ममता बॅनर्जी उद्या घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
कोलकाता : बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने आपली सत्ता राखली आहे. या विजयानंतर पक्षाच्या अध्यक्षा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नवनिर्वाचित आमदारांसह बैठक घेतली. यावेळी तृणमूलचे नवनिर्वाचित आमदारांनी एकमताने ममता बॅनर्जी यांना विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवड केली. या बैठकीनंतर तृणमूल काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाचे सरचिटणीस आणि राज्याचे शिक्षणमंत्री पार्थ चटर्जी म्हणाले की, शपथविधी सोहळा बुधवारी ५ मे रोजी होणार आहे. मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील अन्य सदस्य या दिवशी शपथ घेतील. यासह ६ मे पासून विधानसभेचे अधिवेशनही घेण्यात येणार आहे. यामध्ये सर्व नवनिर्वाचित आमदारांना शपथ दिली जाईल.
चॅटर्जी म्हणाले की, नव्याने निवडलेल्या बैठकीत प्रो टेम स्पीकरचीही निवड करण्यात आली आहे. विधानसभेचे स्पीकर विमान बॅनर्जी यांची यावेळी प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बॅनर्जी सर्व आमदारांना शपथ देतील. चॅटर्जी म्हणाले की, या बैठकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बंगालच्या जनतेचे आणि निवडणुकीत जबरदस्त विजयासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. त्याचबरोबर ममता यांनी यावेळी सांगितले की, कोविडशी लढा देणं याला त्यांची प्राथमिकता असेल.’
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममध्ये पराभवाचा सामना करावा लागला. ममता यांनी निवडणूक निकालाच्या दुसर्या दिवशी नंदिग्राममध्ये गडबड झाल्याचा दावा करत फसवणूक केल्याचा आरोप केला आहे ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ‘कुणीतरी मला निरोप दिला की नंदीग्रामच्या रिटर्निंग ऑफिसरने म्हटलं की, त्यांनी जर फेरमतमोजणीचे आदेश दिले तर त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. राज्यपालांनीही माझे अभिनंदन केले. त्यानंतर अचानक सर्वकाही बदलले.’