लसीकरणाच्या कार्यक्रमातून भाजपचा प्रचार; नाना पटोलेंचा आक्षेप
नागपूर : नागपूर महानगरपालिका निवडणूक सहा महिन्यांवर आली आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रांवरुन प्रचाराची संधी नगरसेवक सोडत नाहीत. नागपूरातील काही लसीकरण केंद्रावर भाजपचे बॅनर्स लागल्याची तक्रार काँग्रेसच्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांनी केली. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आढावा बैठकीतूनच थेट नागपूर पोलीस आयुक्त आणि नागपूर महानगरपालिका आयुक्तांना फोन केला. लसीकरण केंद्रावरील भाजपचे बॅनर्स काढण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवत एकच जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं.
नागपूर महानगरपालिकेत १५ वर्षांपासून भाजप सत्तेत आहे. आता निवडणूक सहा महिन्यांवर आल्याने पुन्हा एकदा भाजप जोमानं कामाला लागलीय. भाजपला टक्कर देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही मैदानात उतरले आहेत. याचाच एक भाग म्हणून कोरोना लसीकरण केंद्रांवर बॅनर्सवरुन काँग्रेस भाजप आमनेसामने पहायला मिळाली. काँग्रेसने नागपूर महानगरपालिका निवडणूकीची तयारी सुरु केलीय. याचाच एक भाग म्हणून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत काँग्रेसची आढावा बैठक घेण्यात आलीय. यावेळी प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना आणि अडचणी जाणून घेतल्या आणि भाजपला टक्कर देण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश नाना पटोले यांनी दिले.