मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेला शहरातील अनधिकृत बांधकामे युद्ध पातळीवर पाडण्याचे आदेश दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत.
कोणत्याही दबावाला बळी पडू नका आणि कुणाचाही दबाव सहन करुन नका. दबावाला झुगारुन अनधिकृत बांधकामांविरोधात युद्धपातळीवर काम करा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत. या बैठकीला पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल आणि पालिकेचे महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी पालिका कर्मचाऱ्यांनी आणि व्यवस्थापनानं कोरोना काळात केलेल्या कामाचंही कौतुक केलं आहे.
कोरोना काळात आपण खूप चांगलं काम केलं आहे. याची दखल जागतिक पातळीवरही घेतली गेली. आता रस्ते, पदपथ, स्वच्छता आणि नागरी सुविधांच्या बाबतीत लक्ष केंद्रीत करुन कामं करा. मुंबईचा देशात आदर्श निर्माण करा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. याशिवाय, रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम प्राधान्यानं पूर्ण झालं पाहिजे अशी सक्त सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. मुंबईत अनधिकृत बांधकामं अजिबात सहन केली जाणार नाहीत. त्यामुळे प्रभाग अधिकाऱ्यांनी जागरुकपणे आपल्या विभागातील अनधिकृत बांधकामांवर तातडीनं कारवाई करावी. कुणाच्याही दबावाला घाबरुन जाऊ नये. मी तुमच्या पाठिशी आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.